येत्या वर्षात रशियामध्ये भारतीयांसाठी ७२ हजार नोकरीच्या संधी
job career
मॉस्को, दि. 23 : रशियाने तब्बल 72,000 भारतीय कामगारांना आपल्या देशात बोलावण्याची योजना आखली आहे. यामुळे भारतीय तरुणांसाठी रशियात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. नुकत्याच झालेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दिल्ली भेटीदरम्यान या विषयावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे.
‘मोस्कोव्स्की कोम्सोमोलेट्स’ या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, रशियाने या वर्षासाठी परदेशी कामगारांचा कोटा 2,35,000 निश्चित केला आहे. या कोट्यातून भारताला अधिकृतपणे 71,817 कामगारांना रशियात काम करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, दिल्ली आणि मुंबईतील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संख्या संपूर्ण भारतातून येणाऱ्या अर्जांच्या तुलनेत खूपच कमी आहे. काही ठिकाणी तर रशियाकडून 10 लाख भारतीयांना व्हिसा देण्याचा दावा केला जात आहे, परंतु रशियाच्या मंत्रालयाने हा दावा अवास्तव असल्याचे सांगून फेटाळून लावला आहे.