“आरोग्यजागर”: आरोग्य शिबिर, अवयव दान व्याख्यान व CPR प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी.

 “आरोग्यजागर”: आरोग्य शिबिर, अवयव दान व्याख्यान व CPR प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी.

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या वतीने “आरोग्यजागर” या विषयावर एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर, अवयव दान जनजागृती व्याख्यान, तसेच आपत्कालीन वैद्यकीय प्रथमोपचार (CPR) प्रशिक्षण सत्र यांचा समावेश होता. कार्यक्रमासाठी डीपीयू. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता, आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याची तयारी, तसेच अवयवदानाबद्दल सामाजिक जाणीव निर्माण करणे हा होता.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. सीमा झगडे (महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे) तसेच डॉ. वृषाली पाटील, विभाग प्रमुख व संचालिका, अवयव दान व प्रत्यारोपण विभाग, डी.पी.यू. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र शासन, मुंबई आणि अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी व रिसर्च सोसायटी, पुणे, व डॉ. डी. व्ही. जाधव, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई), पुणे यांच्या मागर्दर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

अवयव दान जनजागृती व्याख्यानात डॉ. वृषाली पाटील विभाग प्रमुख व संचालिका, अवयव दान व प्रत्यारोपण विभाग, डी.पी.यू. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की अवयव दान ही एक मानवतावादी आणि जीवनदान करणारी कृती असून यामुळे अनेक रूग्णांचे प्राण वाचू शकतात. मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुसे, नेत्रपटल, त्वचा आणि आतडे यांसारख्या अवयवांचे दान केल्यास प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रूग्णांना नवजीवन मिळते. योग्य माहिती, कायदेशीर संमती आणि जनजागृतीमुळे समाजात सामाजिक जबाबदारी, मानवता आणि जीवनमूल्यांची जाणीव निर्माण होते. त्यांनी सांगितले की अवयव दानाचा संकल्प मृत्यूनंतरही इतरांच्या जीवनात आशेचा प्रकाश देणारा सकारात्मक निर्णय आहे.

आपत्कालीन वैद्यकीय प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रमात बेसिक लाइफ सपोर्ट विषयावर डॉ अर्जुन एच सहायक प्राध्यापक डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, पिंपरी, पुणे यांनी हृदय आणि फुफ्फुसांना पुनरुज्जीवित करण्याची प्रक्रिया (CPR) ची सखोल माहिती व प्रशिक्षण दिले. त्यांनी सांगितले की अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास सुरुवातीच्या काही मिनिटांतील CPR जीवन वाचवण्याचे महत्त्वाचे साधन असते. प्रशिक्षणादरम्यान छाती दाबण्याची योग्य पद्धत, श्वसन देण्याची प्रक्रिया, आपत्कालीन परिस्थिती ओळखणे याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सरावासही संधी देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन प्रसंगी आत्मविश्वास व जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.

“हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग क्षेत्रात करिअर करताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. व्यावसायिक शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान असणे आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकी जपत अवयव दानाचा संकल्प करणे आणि ‘सीपीआर’ सारख्या तंत्राद्वारे ‘जीवनरक्षक’ म्हणून सज्ज राहणे ही काळाची गरज आहे. या विधायक उपक्रमात डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे (पिंपरी) मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे.” — डॉ. सीमा झगडे (प्राचार्य महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे)

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ही करण्यात आली. त्यात हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, रक्तदाब, ECG, नेत्र, कान, नाक–घसा, स्त्रीरोग आणि त्वचारोग, हृदयरोग तपासणी यांचा समावेश होता. यासह औषधे व आवश्यक मार्गदर्शन देखील करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचे आभा (ABHA) कार्ड नोंदणीही करण्यात आली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *