संयुक्त महाराष्ट्र आघाडी
मुंबई महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढवणार
सुहास राणे
मुंबई, दि १९-
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी व हितासाठी संयुक्त महाराष्ट्र आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.या आघाडीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ प्रभागमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आघाडी प्रमुख सुहास राणे,अमोल जाधवराव यांनी शुक्रवारी मुंबईत केली. याविषयी मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद झाली.यावेळी परिषदेस प्रमोद शिंदे, राहुल रेळे,प्रदीप सावंत,ॲड रवींद्र राजे, देवेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते .
यावेळी सुहास राणे म्हणाले,मराठी माणसांच्या हक्क अधिकारासाठी लढणाऱ्या १८ सामाजिक संघटनांना एकत्रित करत संयुक्त महाराष्ट्र आघाडीची स्थापना झाली आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी उमेदवार आघाडीच्या माध्यमातून देणार आहोत.तसेच नवी मुंबई ,ठाणे,पालघर,कल्याण डोंबिवली या शहरी भागात उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे.आमच्या भूमिकेशी म्हणजे मराठी माणसाचा हिताचा विचार जर होत असेल तर आम्ही या निवडणुकीत त्यांच्याबरोबर जाऊ. पण;ती भूमिका मराठी माणसाच्या हिताची असावी.पुढील दोन दिवसात संयुक्त महाराष्ट्र आघाडीची उमेदवारांची यादी जाहीर करून जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल.मराठी शाळा वाचविणे, गिरणी कामगारांना घरे मिळणे असे विषय घेऊन आम्ही लढणार आहे.
अमोल जाधवराव म्हणाले,गेले वीस वर्षाहून अधिक चळवळीतील काम करणारी माणसे आहेत.मराठी माणसांसाठी आम्ही एकत्रित लढतोय आहे.रमाकांत बने म्हणाले,मराठी अस्तित्वसाठी ही लढाई लढत आहे.आज राज्यकर्ते मराठी माणसांना दुय्यम स्थान देऊन राजकारण करत आहे.ॲड सुनील साळुंखे म्हणाले,संयुक्त महाराष्ट्र आघाडी मराठीसाठी स्थापन झाली आहे.या आघाडीला कोणताही राजकीय वारसा नाही.ॲड धर्मराज जाधव म्हणाले गेली ३५ वर्षे मी सामाजिक काम करीत आहे.सातत्याने मराठी माणसाची गळचेपी प्रशासन व राज्यकर्ते करीत आहेत.मराठी माणसाला न्याय मिळत नसल्याने ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे.प्रस्थापित यांच्या विरोधात लढाई याच मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहे.KK/ML/MS