‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत चैत्राली गुप्ते महत्त्वाच्या भूमिकेत
मुंबई, दि. १७ : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेच्या नव्या प्रोमोमधून अभिनेत्री चैत्राली गुप्ते Chaitrali Gupte ही सुद्धा महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत असल्याचं समजलं. ती या मालिकेत सावित्रीबाई फुले यांच्या आईची भूमिका साकारणार आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकामुळे ती संधी मला मिळाली. खऱ्या अर्थाने पुनरागमनासाठी उत्तम भूमिका मिळणं यासाठी मी स्वतःला नशिबवान समजते’, अशा शब्दांत चैत्रालीनं भावना व्यक्त केल्या.
चैत्राली म्हणाली की, ‘सावित्रीबाई फुले यांच्या कामाविषयी लहानपणी वाचलं; पण मालिकेत त्यांच्या आयुष्यातल्या काही प्रसंगांचं चित्रण करताना अंगावर काटा येतो. सावित्रीबाई यांनी समाजाविरुद्ध उभ्या राहत स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं खुली केली. अनेक प्रथा मोडीत काढल्या आणि त्यांच्या आईची भूमिका करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. प्रोमो पाहिल्यानंतर ‘आमच्या आईची आई तुम्ही साकारत आहात’ अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. त्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे.’
सावित्रीबाईंच्या आई लक्ष्मीबाई पाटील यांच्याविषयी कमी बोललं, लिहीलं गेलंय. त्यामुळे तसे फार संदर्भ नाहीयेत. सावित्रीबाईंच्या आई खंबीर, खमक्या होत्या. त्या काळातील इतर स्त्रियांप्रमाणे त्याही समाजाला घाबरत होत्या; पण तरीही मुलीवर त्यांनी स्वतंत्र विचारांचे संस्कार केले. तिनं शिकावं अशी त्यांचीही इच्छा नव्हती; पण ती शिकली तर वाईट काही होणार नाही असाही विचार होता. अशा दोन्ही बाजूंना झुकणारी ही व्यक्तिरेखा असून लेखक प्रताप गंगावणे यांच्या लेखनामुळे ती भूमिका वठवण्यास मदत झाली. तसंच त्या काळातील भाषेचा लहेजा, उच्चार सांभाळणं हे मोठं आव्हान होतं. सविता मालपेकर, स्वप्नील राजशेखर आणि दिग्दर्शक कार्तिक केंढे यांनी याकरता सहकार्य केलं.’
SL/ML/SL