लवकरच सुरू होणार भारत टॅक्सी ॲप
मुंबई, दि. १७ : प्रवासी आणि चालक दोघांसाठीही फायदेशीर असणारे भारत टॅक्सी ॲप 1 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. या ॲपमध्ये ऑटो-रिक्षा, कार आणि बाईक सेवा उपलब्ध असेल. वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडू शकतील. ओला आणि उबरसारख्या ॲप्समध्ये पीक अवर्समध्ये भाडे अचानक वाढते, ज्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. भारत टॅक्सी ॲपमध्ये असे होणार नाही. भाडे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. हे ॲप सरकारी उपक्रमाचा भाग आहे, त्यामुळे प्रवाशांना स्वस्त आणि विश्वासार्ह सेवा मिळेल. हे ॲप दिल्लीतून सुरू होत आहे, पण लवकरच इतर शहरांमध्येही येऊ शकते. सरकारी मदतीने हे कॅब मार्केटमध्ये एक नवीन पर्याय बनेल. प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि चालकांना चांगली कमाई मिळेल. खाजगी कंपन्यांची मनमानी कमी होईल.
चालकांना एकूण भाड्याचा 80% पेक्षा जास्त हिस्सा मिळेल. म्हणजे, चालकांची कमाई वाढेल. सध्या बहुतेक खासगी ॲप्समध्ये जास्त कमिशन कापले जाते, ज्यामुळे चालकांची कमाई कमी होते. लॉन्च होण्यापूर्वीच दिल्लीत सुमारे 56,000 चालकांनी नोंदणी केली आहे.
इतर ॲप्सप्रमाणे भारत टॅक्सी ॲपमध्येही रिअल-टाइम वाहन ट्रॅकिंग मिळेल. सुरक्षितता आणि विश्वासार्हतेसाठी, प्लॅटफॉर्म केवळ सत्यापित चालकांनाच ऑनबोर्ड करेल आणि 24 तास ग्राहक समर्थन देईल. हे ॲप अनेक भारतीय भाषांना सपोर्ट करेल.
भारत टॅक्सी हे पहिले राष्ट्रीय सहकारी राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म आहे, जे सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाने तयार केले आहे. यामध्ये चालक देखील सह-मालक असतील. यासाठी सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेडसोबत नुकतेच सामंजस्य करार (MOU) झाला आहे.
SL/ML/SL