माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
मुंबई दि १८ : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास या दोन्ही खात्यांचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राज्यात काल महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास या दोन्ही खात्यांचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या निर्णयास मान्यता दिली असून, याबाबत राज्य शासनाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. पुढील आदेश होईपर्यंत ही दोन्ही महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीत राहणार आहेत.
दरम्यान, मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अद्याप आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. मात्र, सध्या त्यांच्याकडे कोणतेही खाते नसल्याने ते ‘बिनखात्याचे मंत्री’ म्हणून मंत्रिमंडळात आहेत.
कोकाटे यांच्याशी संबंधित न्यायालयीन व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात असून, यामुळे राज्य मंत्रिमंडळातील जबाबदाऱ्यांमध्ये तात्पुरता बदल झाला आहे. या निर्णयाकडे राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून येत्या एक दोन दिवसांत त्यांच्या शिक्षेप्रकरणी सुनावणी अपेक्षित आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यास आणखी काही काळ ते मंत्रिपदी राहू शकतील अन्यथा त्यांना त्वरित राजीनामा द्यावा लागेल.ML/ML/MS