“डॅा. बाबा आढावांचा वारसा थांबणार नाही; सामाजिक चळवळीत आम्ही खंबीरपणे सोबत!”
पुणे, दि.१६ :
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचे निधन झाले असले, तरी त्यांचे विचार आणि कार्य अमर आहे. “बाबांनी आयुष्यभर जोपासलेली सामाजिक चळवळ यापुढेही अविरत सुरू राहावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,” अशी ठाम ग्वाही विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
बाबा आढाव यांच्या निधनानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शिलाताई आढाव व अन्य कार्यकर्त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान त्या भावूक झाल्या होत्या. केवळ दुःख व्यक्त न करता, बाबांचे सामाजिक कार्य आणि चळवळ पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “बाबा आढाव हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ती एक जिवंत संस्था होती. ‘एक गाव–एक पाणवठा’ आंदोलन असो वा हमाल-मापाडी कामगारांचा लढा, त्यांनी नेहमीच शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद केला. आज बाबा आपल्यात नसले तरी त्यांनी जागवलेली प्रेरणा विझू देता कामा नये. शासन आणि समाज म्हणून या चळवळीला बळ देण्यासाठी आणि बाबांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, हा विश्वास देण्यासाठी मी आज येथे आले आहे.”
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी बाबांच्या आठवणींना उजाळा देत आढाव कुटुंबियांना धीर दिला. बाबांचा लढाऊ, निर्भीड आणि समाजाभिमुख वारसा जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी आढाव कुटुंबियांसह विविध सामाजिक चळवळींतील कार्यकर्ते व शिवसेना स्थानिक पदाधिकारी सुधीर कुरुमकर तसेच स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.ML/ML/MS