‘वंदे भारत’ मध्ये आता मिळणार प्रादेशिक खाद्यपदार्थ
मुंबई, दि. १५ : वंदे भारत’च्या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांना आता रेल्वेमध्ये प्रादेशिक खाद्यपदार्थ मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल भवन येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना ‘वंदे भारत’ गाड्यांमध्ये संबंधित प्रदेशातील प्रादेशिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रादेशिक खाद्यपदार्थ समाविष्ट केल्याने प्रवाशांना त्या त्या प्रदेशाची संस्कृती आणि चव अनुभवता येईल, ज्यामुळे प्रवाशांचा अनुभव लक्षणीयरीत्या सुधारेल. भविष्यात ही सुविधा टप्प्याटप्प्याने सर्व गाड्यांमध्ये वाढविण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी सांगितले की, भारतीय रेल्वेने बनावट ओळखपत्रांचा वापर करून ट्रेन तिकीट बुकिंग करण्यावर केलेल्या कारवाईला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. युजरची ओळख निश्चित करण्यासाठी आणि बनावट आयडी शोधण्यासाठी कडक प्रणाली लागू केल्यामुळे, IRCTC वेबसाइटवर आता दररोज सुमारे 5,000 नवीन युजर आयडी जोडले जात आहेत. या नवीन सुधारणांपूर्वी, ही संख्या दररोज जवळपास 1 लाख नवीन युजर आयडी पर्यंत पोहोचली होती.
या उपायांमुळे भारतीय रेल्वेला 3.03 कोटी बनावट खाती निष्क्रिय करण्यात मदत झाली आहे. याव्यतिरिक्त, 2.7 कोटी इतर युजर आयडी त्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे तात्पुरते निलंबित केले गेले आहेत किंवा निलंबित करण्यासाठी निश्चित करण्यात आले आहेत.
SL/ML/SL