नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात 1505 कोटीच्या विकास कामांचे लोकार्पण
नागपूर दि १५ : संविधान चौक ते ऑटोमोटिव्ह चौक पर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येत असून 25 वर्ष एकही खड्डा पडणार नाही अश्या प्रकारचा चांगला रस्ता आपण बांधणार आहोत असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपूर महानगर पालिका, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महारेलच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये 1505 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केंद्रीय वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गड्डीगोदाम चौक येथे करण्यात आले त्यावेळेला बोलत होते. भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन शहरातील तीन ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, माजी महापौर आणि भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, नासुप्रचे सभापती संजय मिना उपस्थित होते. पोद्दारेश्वर राम मंदिर ते पारडी पर्यंतचा रस्ता आपण सिमेंट काँक्रीटचा करीत असून ड्रेनेज सिस्टिम चांगली व्हावी, लाईटची व्यवस्था चांगली व्हावी, फुटपाथ चांगले व्हावे, सायकल ट्रॅक व्हावा असा आपण प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. आपल्या सगळ्यांना चांगल्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे आया, बहिणी फुटपाथ वरून सुरक्षित चालू शकल्या पाहिजे अपघात होता कामा नये आपल्या जीवाची रक्षा झाली पाहिजे या दृष्टीने दोन्ही रस्ते आदर्श करण्या करता महानगरपालिकेने सहकार्य करावे असेही ते म्हणाले.
नागपूर महापालिकेची 560 कोटींची कामे यात नागपूर महापालिकेच्या अंतर्गत 560 कोटी रुपयांची विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यात 430 कोटी रुपयांचे विविध विकास कामांचे भूमीपूजन तर 130 कोटी खर्च करून झालेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.
नासुप्रचे 510 कोटींची कामे
नागपूर सुधार प्रन्यासच्या निधीतून एकूण 510 कोटी रुपयांची कामे यात समाविष्ट आहेत तसेच यात 335 कोटी रुपयांची विविध विकास कामांची भूमिपूजन झाले आहे.
त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संविधान चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत होणार्या 150 कोटी खर्चाच्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन तसेच महामेट्रोतर्फे बांधण्यात येत असलेल्या राम मंदिर ते प्रजापती चौक सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. महारेलतर्फे 135 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या लकडगंज पोलीस स्टेशन ते वर्धमाननगर जुना भंडारा रोड उड्डाणपुलाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.ML/ML/MS