अतिरिक्त गहू उत्पादनामुळे या देशात भूगर्भाची झाली चाळणी
तुर्कस्तानात गव्हाच्या अती उत्पादनामुळे भूगर्भातील पाण्याचा अतिवापर झाला असून परिणामी जमिनीला मोठमोठे खड्डे पडले आहेत. या घटनेमुळे शेतकरी आणि प्रशासन दोघेही गंभीर चिंतेत आहेत. तुर्कस्तानातील मध्य अनातोलियातील कोन्या मैदानाला देशाचे “धान्याचे कोठार” मानले जाते. येथे गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र, गेल्या दोन दशकांत सततच्या दुष्काळामुळे आणि गव्हाच्या सिंचनासाठी भूगर्भातील पाण्याचा अतिवापर झाल्याने जमिनीची रचना अस्थिर झाली आहे. परिणामी, कोन्या मैदानात तब्बल ६८४ पेक्षा अधिक खड्डे (sinkholes) निर्माण झाले असून काही खड्ड्यांची खोली १०० फूटांहून अधिक आहे.
ड्रोनद्वारे घेतलेल्या दृश्यांमध्ये हे खड्डे स्पष्टपणे दिसत असून अनेक शेतजमिनी अक्षरशः गिळंकृत झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे गव्हाचे पीक नष्ट झाले असून त्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे. तुर्कस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संकटाची नोंद घेतली असून, दरवर्षी २० पेक्षा अधिक नवीन खड्डे तयार होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, भूगर्भातील पाण्याचा अनियंत्रित उपसा, हवामानातील बदल आणि दुष्काळ यामुळे ही समस्या गंभीर झाली आहे. कोन्या तांत्रिक विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, गव्हाच्या अतिप्रशस्त उत्पादनासाठी केलेल्या सिंचनामुळे भूगर्भातील जलस्तर झपाट्याने खाली गेला आणि जमिनीची चाळणी होऊन खड्डे पडले.
या संकटामुळे तुर्कस्तानातील अन्नसुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शेतकरी संघटनांनी सरकारकडे शाश्वत सिंचन पद्धती, पीक विविधीकरण आणि भूगर्भातील पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. प्रशासनानेही या खड्ड्यांमुळे होणाऱ्या धोक्यांचा अभ्यास सुरू केला असून, भविष्यातील धोरणांमध्ये बदल करण्याची तयारी दर्शवली आहे.