पाकिस्तानात ‘धुरंधर’विरोधात याचिका दाखल
पाकिस्तानातील कराची न्यायालयात रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर’ चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून या चित्रपटामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानातील पीपल्स पार्टी (PPP) कार्यकर्त्यांनी कराचीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात भारतीय चित्रपट धुरंधर विरोधात संविधानिक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या छायाचित्रांचा, पक्षाच्या झेंड्यांचा आणि सभेच्या दृश्यांचा विनापरवानगी वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, या चित्रपटात PPP ला दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा पक्ष म्हणून दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याचिकाकर्ता मोहम्मद आमिर यांनी दिग्दर्शक आदित्य धर, निर्माते लोकेश धर व ज्योती किशोर देशपांडे, तसेच कलाकार रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन यांच्यासह इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरमध्ये बेनझीर भुट्टो यांच्या प्रतिमा व पक्षाच्या चिन्हांचा वापर करून PPP ची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे.
‘धुरंधर’ हा उच्च-ऑक्टेन स्पाय थ्रिलर चित्रपट असून ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला. आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात गुप्तचर कारवायांच्या पार्श्वभूमीवर कंधार विमान अपहरण, २००१ संसदेवरील हल्ला आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यांसारख्या घटनांचा संदर्भ दिला आहे. चित्रपटातील काही दृश्ये कराचीतील लियारी भागात चित्रित करण्यात आली असून, तेथील गँगवॉर व हिंसक इतिहास दाखवण्यात आला आहे. यामुळे पाकिस्तानातील समीक्षक व जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
पाकिस्तानातील काही प्रेक्षकांनी चित्रपटातील अॅक्शन व अभिनयाचे कौतुक केले असले तरी, ऐतिहासिक चुका, पोशाखातील त्रुटी आणि पाकिस्तानविरोधी संवादांमुळे चित्रपटावर टीका होत आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाविरोधात मोठी चर्चा सुरू असून, PPP कार्यकर्त्यांनी कायदेशीर पातळीवर कारवाईची मागणी केली आहे.