गोवा क्लब आग प्रकरणी लुथरा ब्रदर्सना थायलंडमध्ये अटक

 गोवा क्लब आग प्रकरणी लुथरा ब्रदर्सना थायलंडमध्ये अटक

गोव्यातील बिर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये ६ डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांनी देश सोडून थायलंडला पलायन केले. तपास यंत्रणांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर अखेर भारतीय एजन्सींनी थाई पोलिसांच्या मदतीने या दोघांना ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याच्या रात्रीच लुथरा ब्रदर्सनी ‘मेक माय ट्रिप’ अॅपवरून थायलंडला जाण्यासाठी विमानाची तिकिटे बुक केली होती. त्या वेळी अग्निशमन दल व आपत्कालीन पथके क्लबमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी झटत होती, तर दुसरीकडे क्लबचे मालक देश सोडून पळून जाण्याची तयारी करत होते.

या प्रकरणात याआधी क्लबचे पाच कर्मचारी व व्यवस्थापकांना अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी लुथरा बंधू फरार असल्याने तपासात मोठा अडथळा निर्माण झाला होता. अखेर थायलंडमध्ये झालेल्या रेडमध्ये त्यांना पकडण्यात आले असून, त्यांना भारतात आणून न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

या घटनेमुळे गोव्यातील नाईट क्लब्सच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आग लागल्याच्या वेळी क्लबमध्ये आवश्यक सुरक्षाव्यवस्था नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर नियमावली लागू करण्याची मागणी होत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *