सोयाबीन , कापूस खरेदी प्रश्नावर सभागृह आक्रमक, विरोधकांचा सभात्याग…
मुंबई दि ११ : राज्यातील सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्राबाबत गोंधळ सुरू असून, अनेक ठिकाणी ती बंद आहेत, उशिरा सुरू होतात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करत या बाबतच्या प्रश्नावर संबंधित मंत्र्यांवर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्यानं अखेर विरोधकांनी सभात्याग केला.
याबाबतचा मूळ प्रश्न संतोष दानवे यांनी उपस्थित केला होता, त्यावर राहुल पाटील, बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, विजय वडेट्टीवार नाना पटोले, प्रकाश सोळंके आदींनी प्रश्नांचा भडिमार केला, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी नाडले जात आहेत, त्यामुळे मोठी नाराजी आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली.
राज्यात १६८ खरेदी केंद्र कापूस खरेदी साठी सुरू करण्यात आली त्यातील १५६ सध्या सुरू आहेत. सोयाबीन खरेदीसाठी गेल्या वर्षी पेक्षा नऊ टक्के वाढ देऊन ५,३२८ रुपये इतका दर देण्यात आला असून लाखो क्विंटल खरेदी करण्यात आली आहे अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी दिली मात्र त्याने दोन्ही बाजूच्या सदस्यांचं समाधान झालं नाही, ते जागा सोडून पुढे आले, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दुपारी आपल्या दालनात यावर बैठक घेण्याचं जाहीर केलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातून मार्ग काढू,अध्यक्षांच्या बैठकीत चर्चा करू असं आश्वासन दिलं मात्र नाराज विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.ML/ML/MS