भारतातील या रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव
अमरावती, दि. 8 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने हैदराबादमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासालगतच्या रस्त्याचे नामकरण करण्याचा प्रस्ताव तेलंगणा सरकारने रविवारी (७ डिसेंबर) मांडला आहे. यानुसार, हा हाय-प्रोफाइल रस्ता ‘डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू’ म्हणून ओळखला जाईल. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) जारी केलेल्या निवेदनानुसार, या निर्णयाची माहिती राज्य सरकार लवकरच केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाला आणि अमेरिकन दूतावासाला अधिकृतरित्या देणार आहे.
याशिवाय राज्य सरकारने रविर्याल येथील नेहरू आउटर रिंग रोडला प्रस्तावित प्रादेशिक रिंग रोडशी जोडणाऱ्या आगामी ग्रीनफिल्ड रॅडिअल रोडला दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. रविर्याल इंटरचेंजला यापूर्वीच ‘टाटा इंटरचेंज’ असे नाव देण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या यूएस–इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) परिषदेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हैदराबादमधील काही प्रमुख रस्त्यांना जागतिक कंपन्यांच्या नावाने ओळख देण्याचा प्रस्ताव सुचवला होता. त्यानुसार, सरकारने आता येथील महत्त्वाचा रस्ता ‘गूगल स्ट्रीट’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. गूगलचे आगामी कॅम्पस-जे अमेरिकेबाहेरील सर्वात मोठे कॅम्पस असणार आहे-तो रस्ता ‘गूगल स्ट्रीट’ नावाने ओळखला जाईल. मायक्रोसॉफ्ट आणि विप्रोलाही ‘मायक्रोसॉफ्ट रोड’ आणि ‘विप्रो जंक्शन’ या स्वरूपात शहराच्या नकाशावर स्थान देण्यात येणार आहे. राज्यातील काही अन्य नामवंत व्यक्ती आणि कॉर्पोरेटसाठीही रस्त्यांची नावे समर्पित करण्याचा प्रस्ताव आहे.