वंदे मातरम् संपूर्ण गायन आणि पंचाहत्तर कोटींच्या पुरवणी मागण्या
मुंबई दि ८ ( मिलिंद लिमये ): विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. वंदे मातरम् आणि राज्यगीताने कामकाजाची सुरुवात दोन्ही सभागृहात झाली आणि त्यानंतर वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संपूर्ण वंदे मातरम् गीताचे गायन दोन्ही सभागृहात करण्यात आले. राज्य विधिमंडळात आणि सरकारी कामकाजात पहिल्यांदाच याचे प्रसारण झाले. त्यासोबतच सुमारे पंचाहत्तर हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या.
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्यानंतर झालेल्या पावसाळी अधिवेशनात तब्बल चौऱ्याण्णव हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यात आल्या होत्या. तर या अधिवेशनात पुन्हा पंचाहत्तर कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत. राज्यात झालेला अवकाळी पाऊस, काही ठिकाणी झालेली पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांची दैना झाली होती, त्यांना पुरेशी मदत देऊन आपल्याला निवडणुकीत त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी महायुती सरकारने एकतीस हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करून मदत वितरितही केली, याचा ताण राज्याच्या तिजोरीवर आला आहे, लाडक्या बहिणींच्या योजनेचा बोजा आधीच सरकारवर आहे,यासोबतच राज्यात कुंभमेळा देखील होत आहे या सगळ्यांसाठी या पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून चैनसुख संचेती , समीर कुणावार , किशोर आप्पा पाटील, सरोज अहिरे, राहुल पाटील , उत्तम जानकर आणि रामदास मसराम यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली.
यानंतर विधिमंडळाचे कामकाज गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोप नाना पटोले यांनी सभागृहात केला. घाईघाईने कामकाज उरकले जात आहे असं ते म्हणाले.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आम्ही आमचे म्हणणं मांडले होते, आम्ही सहजी पद्धतीने त्याला मान्यता दिली नाही असा खुलासा भास्कर जाधव यांनी यावेळी केला. विधिमंडळाचे अधिवेशन आणि त्यातील कामकाज किती तसंच काय असावं यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने चर्चा होऊन निर्णय होतो , त्यामुळे आता त्यावर वेगळी चर्चा होणार नाही असे स्पष्टकरण अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. मात्र
कोरोना काळात इतर राज्यात जास्त काळाची अधिवेशने सुरू असताना महाराष्ट्रात मात्र मुंबईत देखील दोन चार दिवसांची अधिवेशने झाली याची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी करून दिली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने आचारसंहिता लागू होणार आहे म्हणून हा अधिवेशन कालावधी कमी करण्यात आला आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. हा अनुशेष नंतर जास्त कालावधीचे अधिवेशन करून भरून काढण्यात येईल अशी ग्वाही देखील फडणवीस यांनी दिली.
यानंतर विधानसभेचे दिवंगत सदस्य शिवाजीराव कर्डिले , माजी सदस्य महादेवराव शिवणकर, भारत बोंद्रे, श्याम उर्फ जनार्दन आष्टेकर, यशवंत दळवी, नारायण पटेल, सिद्रामप्पा पाटील, गिल्बर्ट मेंडोन्सा , राजीव देशमुख आणि निर्मला ठोकळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारा प्रस्ताव अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी सभागृहात मांडला, त्याला सभागृहाने दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मंजुरी दिली . शोक प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.ML/ML/MS