अधिवेशनात जनतेला न्याय, विरोधक निराशावादी आणि त्रागा करणारे
नागपूर दि ७ : नेहमीची परंपरा पाळत विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय होता,
निराशेने भरलेली आणि त्रागा करणारी त्यांची पत्रपरिषद होती अशी टीका करत या अधिवेशनात आम्ही जनतेला न्याय देऊ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस ईमानदार आणि सुसंस्कृत होती याची भास्कर जाधव यांना उपरती झाली हे समजले. आम्हाला विरोधी पक्षाकडून आलेल्या पत्रावर शरद पवारांच्या पक्षाच्या लोकांच्या सह्या नाहीत. २०१४ पूर्वीचा विदर्भ आणि आताचा विदर्भ यात आमूलाग्र बदल , पायाभूत सुविधा, सिंचन यात मोठा बदल झाला आहे असे ते म्हणाले. त्यामुळे विदर्भ विकासाबाबतचे वडेट्टीवार यांचे आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काही प्रमाणात ओढाताण होत असली तरी सर्व निकष पूर्ण करणारी आमची अर्थव्यवस्था आहे, पात्र आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नव्वद टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त नुकसानीची आर्थिक मदत मिळाली , फक्त सहा लाख शेतकऱ्यांना मदत देणं बाकी आहे, तीही लवकरच देऊ असे ते म्हणाले.
या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत, विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर उत्तर देऊ, हे अधिवेशन आचारसंहितेमुळे कमी कालावधीचे असले तरी जास्तीत जास्त कामकाज करून जनतेला अधिकाधिक लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. आमची पळून जाण्याची मानसिकता नाही, विरोधी पक्षनेते पदाबाबत पीठासन अधिकारी निर्णय घेतील , आमचा त्यात हस्तक्षेप नाही असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात असणाऱ्या कार्यामुळे ते आता उपस्थित नाहीत , उद्या ते सहभागी होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
या अधिवेशनात अठरा विधेयके मंजूर करण्याचा प्रयत्न आहे. शक्ती कायद्यातील काही घटना संबंधी तरतुदीमुळे ते विधेयक केंद्र सरकडून परत आले आहे, आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थ प्रकरणी कायद्यातील सुधारणा यावर केंद्र सरकार कडे पाठपुरावा सुरू आहे. लोकायुक्त कायद्यात बदल सुचविण्यात आला आहे तर जनसुरक्षा कायद्याला लवकरच मंजुरी मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
अधिवेशनात सभागृहात चर्चा न करता केवळ पायऱ्यांवर आंदोलन करण्यात धन्यता मानत आहेत, यावेळी विरोधी पक्ष कमजोर दिसत आहेत, टीका करणाऱ्यांनी किमान संपूर्ण अधिवेशनात तरी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी यावेळी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंचाहत्तर टक्क्यांहून ठिकाणी महायुतीला अधिक यश मिळेल असे सांगत विधिमंडळात विरोधी पक्षनेते पद मिळण्यासाठी आवश्यक संख्याबळ तरी मिळावे यासाठी त्यांनी जनतेत जाऊन प्रयत्न करावे असा सल्ला शिंदे यांनी यावेळी दिला.ML/ML/MS