विरोधी पक्षाचा चहापानावरील बहिष्कार कायम
नागपूर दि ७ : लोकशाहीची मूल्ये न पाळणाऱ्या, शेतकऱ्यांच्या असंख्य प्रश्नांवर उत्तरे न देणाऱ्या, सत्ताधाऱ्यांमधील बेबनाव उघड करण्यात स्पर्धा करणाऱ्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालणंच योग्य अशी भूमिका घेत विरोधी पक्षानं सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय दरवर्षीप्रमाणे कायम ठेवला आहे. नागपूरमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते भास्कर जाधव, अनिल परब, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख आदी नेते यावेळी उपस्थित होते.
महायुती सरकार मध्ये प्रचंड बेबनाव आहे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, मंत्र्यांनी आणि त्यांचा संबंधित लोकांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढून ही त्यावर कारवाई होत नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत, अनेक उपयोगी योजना बंद करण्यात येत आहेत असा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
पाशवी बहुमत असतानाही आणि घटनेत विरोधी पक्षनेते पद नेमण्यासाठी कोणतीही आडकाठी नसतानाही ती नेमणूक टाळली जात आहे, या सरकारचा भ्रष्टाचार लपवला जात आहे. प्रत्येक गुन्ह्यात मुख्यमंत्री क्लीन चीट देतात. सरकारची पापे लपविण्यासाठी काहीना थेट एन्काऊंटर मध्ये मारले जात आहे. सभागृह नीट चालवलं जात नाही, विरोधी पक्षाला गांभीर्यानं पाहिलं जात नाही यामुळे हा बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला अशी भूमिका भास्कर जाधव यांनी यावेळी मांडली.ML/ML/MS