Indigo मुळे कहर, पुणे- मुंबई विमान तिकीट तब्बल 61 हजार रु
मुंबई, दि. ५ : Indigo Airlines कडून सध्या देशभर सुरु असलेल्या प्रचंड गोंधळाच्या स्थितीमुळे प्रवासी वैतागले आहेत.
नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) या गोंधळाचं मुख्य कारण ठरलं आहे. इंडिगो एरलाईन्स कंपनीच्या ऑपरेशन समस्यांमुळे प्रवासी ताटकळलेले असताना, दुसरीकडे इतर विमान सेवा कंपन्यांनी दर वाढवले आहेत. पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट तब्बल 61 हजारांवर गेलं आहे. पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट 27 हजार तर पुण्याहून बंगलोरसाठी 49 हजार मोजावे लागत आहेत.
दुसरीकडे मुंबई- नागपूर एअर इंडियाचे तिकीट 63 हजारावर पोहोचले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुंबई -नागपूर विमान प्रवास प्रचंड महाग झाला आहे.
सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनी गंभीर ऑपरेशनल समस्यांचा सामना करत असल्याने प्रवाशांना फटका बसला आहे. विमान उड्डाणाची संख्या कमी झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांची तिकिटं मात्र चौपटीने वाढली आहेत. देशभरातून इंडिगो ची तब्बल 600 हून अधिक विमाने आज रद्द झाली आहेत. रद्द होणाऱ्या विमानांची ही संख्या मागील दिवसांपेक्षाही जास्त असल्याने, प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
विमान उड्डाणं रद्द आणि विलंबत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर IndiGo ने एक निवेदन जारी केलं आहे. “आम्ही पुष्टी करतो की 5 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली विमानतळावरून (DEL) निघणाऱ्या सर्व इंडिगो देशांतर्गत उड्डाणे रात्री 11.59 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. या अनपेक्षित घटनांमुळे गंभीरपणे प्रभावित झालेल्या आमच्या सर्व मौल्यवान ग्राहकांची आणि भागधारकांची आम्ही मनापासून माफी मागतो. आमच्या प्रभावित ग्राहकांना पाठिंबा देण्यासाठी, आम्ही त्यांना अल्पोपहार, त्यांच्या पसंतीनुसार पुढील उपलब्ध उड्डाण पर्याय, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, त्यांचे सामान परत मिळविण्यात मदत आणि लागू असल्यास पूर्ण परतफेड देत आहोत”, असं निवेदनात सांगण्यात आलं आहे.
SL/ML/SL