खा.संजय दिना पाटील यांच्याकडून सरकारच्या वैद्यकीय सुविधांचे वस्त्रहरण
मुंबई, दि. ४ – मुंबई शहरातील सर्व कचर माझ्या मतदार संघात येत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे आयुमान दिवसेंदिवस कमी होत असून ते विविध दुर्धर आजाराने ते ग्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालये नाहीत. डॉक्टर, कर्मचा-यांची संख्या कमी आहे. या सारख्या गंभीर विषयावर बोलण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांना गेले दिड वर्षे वेळ मागुणही ते वेळ देत नाहीत. आरोग्याच्या समस्यांबाबत संसदेत बोलू दिले जात नाही. असा गंभीर आरोप ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी केला. नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदन मध्ये जे.पी. नड्डा यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी खासदार संजय दिना पाटील बोलत असताना त्यांनी सरकारच्या व्यवस्थेचे वाभाडे काढले.
क्षयरोगाला आळा घालण्यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्य़ाण मंत्री जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील आरोग्याच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्व खासदारांना बोलविण्यात आले होते. यावेळी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी मतदार संघातील आरोग्यांच्या समस्यांबाबत सरकारवर जोरदार टीका करुन सरकारच्या अनागोंदी कारभाराचे वस्त्रहरण केले.
ईशान्य मुंबईत मुलुंड, कांजुर मार्ग व देवनार येथे डम्पिंग ग्राऊंड असून मुंबई शहरातील सर्व कचरा या ठिकाणी आणून टाकला जातो. त्यापैकी मुलुंड आणि कांजुरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंड बंद झाले असले तरी तेथे असलेल्या लाखो टन कच-यातून विषारी धूर व कच-यांना लागत असलेल्या आगीमुळे स्थानिक नागरीकांचे आयुष्य धोक्यात आले आहे. श्वसनाचे आजार, क्षयरोग, त्वचा रोगांमुळे नागरीकांचे आयुमान कमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ईशान्य मुंबई मध्ये एकही सुसज्ज रुग्णालय नसून वैद्यकीय सुविधा शून्य आहे. पाचशे – आठशे बेडचे रुग्णालय आहे. मात्र त्या ठिकाणी डॉक्टर, कर्मचारी नाहीत. आहे त्या रुग्णालयात गेल्यावर चांगला माणुसही आजारी पडेल अशी बिकट अवस्था ईशान्य मुंबईतील रुग्णालयाची असल्याचा आरोप खासदार संजय दिना पाटील यांनी या बैठकीत केला. या सर्व समस्यांवर बोलण्यासाठी गेले दीड वर्षे जे.पी. नड्डा यांची वेळ घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र ते वेळ देत नाहीत. शिवाय या समस्यांबाबत लोकसभेत बोलायला दिले जात नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील रुग्णालयांची दयनिय स्थिती, आवश्यक सुविधा व मनुष्यबळातील कमतरता तसेच डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या गंभीर, दीर्घकालीन आणि धोकादायक परिणामां विषयी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करुन त्यांनी सरकारला धारेवर धरले. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या समस्यांवर तात्काळ निर्णय घेऊन परिणामकारक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी या बैठकीत केली. यावर जेपी नड्डा मुंबईत आल्यावर येथील समस्यांची पाहणी करुन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे खा. संजय दिना पाटील यांनी शेवटी सांगितले.ML/ML/MS