शेतकऱ्यांसाठी केंद्राची मदत लवकरच !
मुंबई दि. ३ :
महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे वेळेत प्रस्ताव पाठविला, त्यानंतरच केंद्राचे पाहणी पथक येऊन पाहणी करून गेले, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्यांच्या पायाभूत सुविधांची उभारणी व्हावी यासाठी सरकार कटीबद्ध आहे. म्हणूनच, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाठपुरावा करणारी दोन पत्रे केंद्राकडे पाठविली. दोन्ही प्रस्तावांच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळेल. दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून केंद्राला वेळेत प्रस्ताव आला आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी बुधवारी दिले.
• काँग्रेस हे बुडते जहाज
एआयचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेसने व्हिडिओ केला. याबाबत बावनकुळे म्हणाले की, त्यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून आपले जीवन सुरू केले. त्यांच्या जीवन संघर्षावर टीका करणे किंवा जुने व्हिडिओ व्हायरल करणे, ही काँग्रेसची पराभूत आणि घृणास्पद मानसिकता आहे. मोदींच्या चरित्रावर टीका करणे विरोधकांना नेहमीच अंगलट आले आहे. काँग्रेस हे बुडते जहाज असून २०२९ पर्यंत काँग्रेस नामशेष झालेली दिसेल. लोकं विसरत नाही. आणि लोकप्रिय पंतप्रधानाबाबत केलेली टीका जनता माफ सुद्धा करत नाही, असा टोला मंत्र्यांनी लगावला.
• कुंभमेळा होणारच; झाडांचे पुनर्रोपन
कुंभमेळ्यासाठी जागेची अडचण असल्यास झाडांचे पुनर्रोपन केले जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून झाडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लावली जातील, पण एकही झाड नष्ट होऊ दिले जाणार नाही. काही राजकीय लोक पर्यावरणवादी असल्याचा आव आणून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा किंवा कुंभमेळा रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, पण कुंभमेळा होणारच, असे बावनकुळे यांनी ठणकावून सांगितले.
• पाण्यासाठी जमिनीचे दान; दत्तात्रय वाघेरेंचा सन्मान
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जातेगाव खुर्द या गावात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यासाठी सरकारी जागा उपलब्ध नव्हती. खाजगी जागा संपादनासाठी ३ वर्षे लागली असती. अशावेळी गावातील दत्तात्रय हरीजी वाघेरे यांनी स्वतःहून पुढाकार घेत आपली ०.१६ हेक्टर खाजगी जमीन गावासाठी मोफत दान केली. त्यांच्या या सामाजिक दायित्वाबद्दल शासनाच्यावतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. समाजात दातृत्व वाढीस लागावे यासाठी प्रोत्साहन मिळावे ही भावना यामागे आहे.
• विरोधकांचा दुतोंडीपणा
३१ जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे बंधन आहे. त्यामुळे आचारसंहितेची अडचण येऊ नये म्हणून हिवाळी अधिवेशन सुट्टी न घेता सलग ९ दिवस (सोमवार ते रविवार) चालणार आहे. विशेष म्हणजे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी याला संमती देऊन स्वाक्षरी केली, मात्र बाहेर येऊन ते वेगळी भूमिका मांडत आहेत. विरोधकांचे हे वागणे योग्य नसल्याचे बावनकुळे यांनी सुनावले.
• ती ‘फाईल’ गायब होणार नाही
मंत्रालयातून महात्मा फुले यांच्याशी संबंधित महत्वाची फाईल गहाळ झाल्याप्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल झाला आहे. ही फाईल ई-ऑफिसवर उपलब्ध असून ती पुन्हा जनरेट केली जाईल. मात्र, फाईल गहाळ होणे गंभीर असून, संबंधित जबाबदार अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
• पराभवाच्या भीतीतून ईव्हीएमवर संशय
सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी ईव्हीएम आणि स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबाबत केलेले आरोप बावनकुळे यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, सांगली किंवा इतर ठिकाणी ईव्हीएम सुरक्षित आहेत. विरोधकांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे. केवळ कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी ते निवडणूक आयोगावर आणि यंत्रणेवर बिनबुडाचे आरोप करत आहेत.ML/ML/MS