नवरगावच्या मथुरा ताई प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर प्रशासनाची तत्काळ मदत
मुंबई, दि ३: नवरगाव (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) येथील ७२ वर्षीय मथुरा ताई यांच्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीबाबत टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ मदतीचे निर्देश दिले. उपसभापतींच्या सूचना मिळताच जिल्हा प्रशासनाने त्वरेने प्रत्यक्ष भेट देऊन विविध शासकीय योजनांतून आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे.
इ.स. १९७२ मध्ये देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मथुरा ताई यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने देशभर तीव्र संताप उसळला होता. या प्रकरणामुळे महिलांवरील अत्याचारासंदर्भातील कायद्यात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. आज ७२ वर्षांच्या झालेल्या मथुरा ताई अर्धांगवायूने पीडित असून त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी बातमी पाहताच जिल्हाधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून मथुरा ताईंना आर्थिक, वैद्यकीय व सामाजिक पातळीवर त्वरित मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने खालीलप्रमाणे मदत जाहीर केली आहे:
जिल्हा प्रशासनाने केलेली मदत :
- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना : १५०० रुपये प्रतिमाह मंजूर
- अंत्योदय अन्न योजना (रेशन कार्ड रूपांतर) : १० किलो गहू + २५ किलो तांदूळ प्रतिमाह
- पंतप्रधान आवास योजना : घरकुल मंजूर; पहिला हप्ता वितरित
- ८ लाख रुपये आर्थिक सहाय्य : (४ लाख रुपये कर्मचारी कल्याण निधीतून) — संपूर्ण रक्कम मुद्दत ठेव; दरमहा अंदाजे ५००० रुपये व्याज मिळण्याची व्यवस्था
- आदिवासी सबलीकरण व स्वाभिमान योजना : जमिनीचे प्रस्तावित प्रकरण प्रक्रिया मार्गावर
- स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वस्तू व आर्थिक मदतीसाठी समन्वय साधला
- नियमित भेटी आणि देखरेखीसाठी संपर्क अधिकारी नियुक्त
मथुरा ताईंच्या अर्धांगवायू स्थितीचा विचार करून आवश्यक फिजिओथेरपी, औषधोपचार आणि अपंगत्वासंदर्भातील उपकरणे उपलब्ध करून देण्याचेही निर्देश उपसभापतींनी दिले आहेत.
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत, “मथुरा ताईंना पुढील काळातही आवश्यक सर्व शासकीय व सामाजिक मदत नियमितपणे मिळेल यासाठी माझ्याकडून सतत पाठपुरावा केला जाईल,” असा निर्धार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.KK/ML/MS