बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर ‘ सारख्या ॲप आधारित कंपन्या वर गुन्हे दाखल करा..
मुंबई दि ३: शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर यासारख्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्या विरोधात गुन्हे दाखल करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत.
शासनाने ई-बाईक धोरण नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार अनेक ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. तथापि , चालकांना नियमावली व प्रवासी सुरक्षिततेसंबंधी कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांची नियुक्ती करून त्या खाजगी अथवा साध्या बाईक द्वारे प्रवासी सेवा दिली जात आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. नुकतीच एका प्रवाशाचा अशा अवैध बाईक टॅक्सी वरुन जाताना मृत्यू झाला आहे. हि घटना ताजी असताना उपरोक्त ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्या शासनाच्या नियमावलीची पायमल्ली करून बेकायदेशीर व्यवसाय करीत आहेत. अशा अनेक तक्रारी मंत्री सरनाईक यांच्या कडे येत होत्या.
या तक्रारीची दखल घेत अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.” देशातील इतर राज्यांत ज्या पद्धतीने या कंपन्या शासकीय नियमांना हरताळ फासून बेकायदेशीर व्यवसाय करतात, तसे महाराष्ट्रात चालणार नाही!
प्रवाशांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून सर्वसामान्य चालकांचे शोषण न करता नियम व सुरक्षिततेचे निकष पाळून आपला व्यवसाय वृद्धिंगत करणाऱ्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांना शासनाचा पाठिंबा राहील परंतु अज्ञानी चालकांचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीर रित्या शासकीय नियमांची पायमल्ली करून प्रवाशांचा जीव धोक्यात आणणाऱ्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांवर यापुढेही अशीच धडक मोहीम राबवली जाईल
“. जितक्या बाईक अशाप्रकारे बेकायदेशीर वाहतूक करताना आढळतील तितके गुन्हे संबंधित चालकावर न दाखल करता ती बाईक ज्या ॲप आधारित कंपनीची आहे, त्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सज्जड दम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
त्यांच्या निर्देशानुसार २ डिसेंबर रोजी ‘ रॅपीडो ‘ (Ropn Transport Private Limited) या ॲप आधारित कंपनीविरोधात मोटार परिवहन विभागाने मुंबईतील घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ‘ रॅपीडो ‘ कंपनीच्या वतीने मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ६६ (१) आणि १९२ अन्वये बेकायदेशीररित्या ‘बाईक टॅक्सी’ चालवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आरटीओ (RTO) च्या मोटार वाहन निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत ‘रॅपुडो ‘ म्हणजे रोपन ट्रान्सपोर्ट कंपनी ‘राइड शेअरिंग’ (Ride Sharing) च्या नावाखाली प्रवाशांची वाहतूक करत असल्याचे उघड झाले.
विशेष म्हणजे, कंपनीने प्रवासासाठी वापरलेली वाहने ही खासगी मालकीची (Non-Transport Vehicles) होती. मोटार वाहन कायद्यानुसार, खासगी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही, कंपनीने नफा मिळवण्याच्या उद्देशाने या नियमांचे उल्लंघन केले.
नेमका गुन्हा काय?
‘ रॅपीडो ‘ (रोपन ट्रान्सपोर्ट कंपनीने) या ॲप आधारित कंपनीने मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ६६ (१) चे उल्लंघन करून खासगी वाहनांचा (उदा. दुचाकी – बाईक) व्यावसायिकरित्या प्रवासी वाहतुकीसाठी उपयोग केला.
या संदर्भात मोटार वाहन निरीक्षक रवींद्रनाथ देशमुख यांनी तक्रार दाखल केली, ज्यानंतर कंपनीविरोधात कलम ६६, १९२ आणि ११२ (वाहन वेगाचे नियमन) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
तपासणी दरम्यान घाटकोपर रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरात तपासणी करत असताना, मोटार वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या ॲपद्वारे बुकिंग केलेल्या अनेक दुचाकी टॅक्सी चालकांना रंगेहाथ पकडले.
यामध्ये विनोद पाटील (चालक) आणि अप्पाराव पिडपारे (प्रवासी) यांसारख्या व्यक्तींकडून बाईक टॅक्सी सेवेचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. काही चालकांकडे दुचाकीच्या वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचेही आढळून आले.ML/ML/MS