मराठमोळा दिग्दर्शक सचिन आंबातचा “असुरवन” चित्रपट ५ डिसेंबरला महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
मुंबई, दि ३
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा येथील हमरापूर (आंबातपाडा) या गावातून आलेला सचिन रामचंद्र आंबात हा तरुण दिग्दर्शक आपली आदिवासी प्राचीन वारली परंपरा त्याच्या आगामी “असुरवन” चित्रपटातून लोकांपर्यंत पोहोचवत आहे. महाराष्ट्राच्या मातीत चित्रित झालेला “असुरवन” हा मराठी चित्रपट येत्या ५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. स्वप्नस्वरूप प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर, ट्रेलर, टीज़र सोशल मीडियावर झळकले त्यानंतर चित्रपटाच्या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. वाघाच्या चित्राने रंगवलेला मुखवटा, अद्भुत जंगल आणि आदिवासी संस्कृतीची सांगड तसेच बॅकग्राउंड संगीतामुळे या सगळ्यातून चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याची उत्कंठा अधिकच वाढली आहे.

असुरवन चित्रपटात दाखवलेल्या वारली संस्कृतीविषयी दिग्दर्शक सचिन आंबात सांगतात, “असुरवन चित्रपट म्हणजे माझ्या बाबांच स्वप्न. माझ्या बाबांची इच्छा होती की आपली वारली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचावी त्यासाठी मी हा चित्रपट करण्याचं ठरवलं. माझा भाऊ सागर रामचंद्र आंबात हा कार्यकारी निर्माता म्हणून माझ्या पाठीशी उभा राहीला. जेव्हा ‘असुरवन’ चित्रपटाचं मोशन पोस्टर, टीज़र आणि ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला तेव्हा प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट्स करत चांगला प्रतिसाद दिला.”
असुरवन चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनबद्दल ते सांगतात, “असुरवन चित्रपटाचं शूटिंग हे घनदाट जंगलात झाल आहे. असुरवन चित्रपट ठाण्याच्या वाडा तालुक्यातील काही आदिवासी पाड्यांमध्ये, बदलापूर येथील बोहोनोली गाव तसेच अंबरनाथ मधील गोरपे गाव या ठिकाणी शूटिंग करण्यात आल आहे. प्राचीन वारली संस्कृतीचं एक सुंदर मंदिर देखील या चित्रपटात आम्ही दाखवलं आहे.”
असुरवन चित्रपटाच्या कथानकाबाबत विचारता ते सांगतात, “वारली संस्कृती ही निसर्गाशी जोडली गेलेली संस्कृती आहे. त्यांचे देव हे मुर्तीतले नाही आहेत. ते निसर्गाला देव मानतात. त्यांच राहणीमान, खाद्य संस्कृती हे निसर्गावर अनुरूप आहेत. निसर्गात राहणारी आदिवासी माणस ही निसर्गाला हानी न पोहोचवता निसर्गाच्या सानिध्यात राहतात. जंगल वाचवण्यासाठी ते देवाला फिरसत्या म्हणतात जो कोकणात राखणदार म्हणून ओळखला जातो. वाघोबा देव म्हणजे जंगलाचा राजा. वारली माणस त्यालाच देव मानतात. वारली संस्कृतीत “रवाळ” नावाचा प्रकार आहे. ज्यात दोन ते तीन दिवसाचा एक खेळ असतो. तो खेळ ही माणस देवांसोबत खेळतात. त्यांच्या अंगात एक दैवी शक्ती येते. आणि मग ते मुखवटे घालून वाघोबा देवाचा संचार झाला. की ते वाघाचा मुखवटा परिधान करून नाचतात. वर्षातून एकदा ते रवाळ करतात. त्यातून ते देवाची आठवण काढून देवाचा सन्मान करत असतात.”
पुढे ते सांगतात, “मराठीत अस सस्पेन्स, थ्रिलर शापीत जंगलाची कथा पहिल्यांदाच चित्रपटातून मांडण्यात आली आहे. येत्या ५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आणि माझी खात्री आहे रसिक प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल. माझी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी एकदा तरी असुरवन चित्रपट थिएटर मध्ये जाऊन नक्की पहावा.”KK/ML/MS