माझ्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही – सुनिल तटकरे

 माझ्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही – सुनिल तटकरे

मुंबई दि. २ डिसेंबर – माझ्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही, मात्र स्वतः कृत्य करायचं आणि दुसर्‍यावर गलिच्छ आरोप करायचे हा धंदा त्यांनी आयुष्यभर केलेला आहे यापेक्षा अधिक सांगायचं नाही. त्यामुळे जे हिस्ट्रीशिटर आहेत त्यांची यापूर्वीची हिस्ट्री समजून घेत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या आरोपाची सखोल चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या महाड शहरात नगरपरिषद निवडणूकीत जो प्रकार घडला तो निंदनीय असून त्याचा तीव्र शब्दात सुनिल तटकरे यांनी निषेध व्यक्त केला आहे.

सकाळपासूनच नामदार पुत्र लवाजम्यासह शहरात फिरत होते. मतदान केंद्रात जाऊन निवडणूक निर्णय अधिकार्‍यांशी वाद घालत होते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्रावर फक्त उमेदवार, प्रतिनिधी किंवा त्यांचे पोलिंग एजंट यांनाच आत प्रवेश असतो. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कायद्याचा भंग अगोदरच केला आहे असाही थेट हल्लाबोल सुनिल तटकरे यांनी केला आहे.

त्यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत त्या आरोपाची सखोल चौकशी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी करावी अशी विनंती केली आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

माझ्या आयुष्यात असे कृत्य कधी केले नाही हे सांगतानाच ज्यांचे सर्व आयुष्य हिस्ट्रीशिटर म्हणून गेले आहे. त्यांनी किमान असं बोलण्याचा प्रयत्न करु नये असा टोला लगावला शिवाय चार वर्षांपूर्वीच एकत्रित शिवसेना असताना जिल्हाप्रमुखाला कुणी मारहाण केली होती हे सर्वश्रुत आहे याची आठवणही सुनिल तटकरे यांनी करुन दिली.

महाड शहरात शांततेचे वातावरण प्रस्थापित करण्याची आवश्यकता असताना ज्या पद्धतीचे गुंडगिरीचे दर्शन झाले हे अत्यंत निंदनीय आहे. सुशांत जाबरे हा एकेकाळी त्यांचा जवळचा कार्यकर्ता होता. तीन महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेला आकस हा त्यांनाच माहिती असेल. जाबरे यांनी काय कारणामुळे शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हे जगजाहीर आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

माझ्यावर निराधार आरोप करत असताना जी भाषा वापरली गेली आज माझे वय ७१ आहे याचे भान ते विसरलेले दिसतात. एकेरी भाषेत बोलून आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन उभ्या महाराष्ट्राला घडवले आहे. अशाच विचारधारेत वाढणारी माणसं वेगळी वागतील अशी अपेक्षा कुणाची नव्हती असा जबरदस्त टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.

मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच रोहा, श्रीवर्धन, नगरपंचायत निवडणूकीत मतदारांना, माझ्या सहकार्‍यांना भेटण्यासाठी गेलो होतो हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *