जग भयंकर मंदीच्या उंबरठ्यावर – जगप्रसिद्ध लेखकाचा इशारा
मुंबई, दि. १ : जगप्रसिद्ध रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक आणि गुंतवणूक तज्ज्ञ रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरून जागतिक अर्थव्यवस्थेबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की जग “इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक मंदीच्या” उंबरठ्यावर आहे आणि ही घसरण प्रत्यक्षात सुरू झाली आहे.
कियोसाकींच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या वाढत्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या कमी होतील. याचा थेट परिणाम ऑफिस स्पेस, रिअल इस्टेट आणि पारंपरिक उद्योगांवर होणार आहे. त्यांनी जपानमधील 30 वर्ष जुना आर्थिक बबल फुटल्याचे उदाहरण देत सांगितले की आशिया, युरोप आणि अमेरिका या सर्वच बाजारपेठा सध्या अस्थिरतेच्या छायेत आहेत.
गुंतवणूकदारांना त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की पारंपरिक शेअर बाजारावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. त्याऐवजी सोने, चांदी, बिटकॉइन आणि इथेरियम यांसारख्या “सुरक्षित मालमत्तांमध्ये” गुंतवणूक करावी. त्यांच्या मते, संकटाच्या काळात योग्य वेळी योग्य निर्णय घेणाऱ्यांना मोठ्या संधी मिळू शकतात.
कियोसाकी यांचे इशारे अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत, कारण ते नेहमीच बाजारातील मोठ्या घसरणीबद्दल बोलतात. तरीही, त्यांच्या ताज्या पोस्टमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वळण्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
SL/ML/SL