कबड्डीची अष्टपैलू खेळाडू सोनाली शिंगटेची विजयी मिरवणूक जल्लोषात
मुंबई, दि १
ढाका, बांगलादेश येथे आयोजित दुसऱ्या महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम विजेतेपदाचे सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान देणारी भारतीय संघाची अष्टपैलू खेळाडू कु. सोनाली शिंगटे हिच्या सन्मानार्थ डिलाईल रोड येथे भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. या विजयी मिरवणुकीला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या मिरवणुकीत कु. सोनाली शिंगटे हिचे तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आमदार सुनील शिंदे यांनी त्यांना पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि भेट वस्तू देऊन मनापासून अभिनंदन केले. डिलाईल रोडसारख्या मेहनती व कष्टकरी भागातील सर्वसामान्य कुटुंबातून कबड्डीच्या मैदानावर जिद्द, कष्ट आणि प्रतिभेच्या जोरावर पुढे आलेली ही मुलगी आज जागतिक स्तरावर भारताचा गौरव वाढवते आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. अशा प्रकारच्या मुलांना जास्त वाव देण्यासाठी आम्ही निरनिराळ्या योजना हाती घेत असून यापुढे देखील विविध खेळांचे शिबिर लावून असण्याची माहिती शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी दिली. यावेळी शिंगटे हिचे अभिनंदन करण्यासाठी संपूर्ण डिलाईल रोड परिसरातून अनेक नागरिक आणि महिला उपस्थित होत्या. KK/ML/MS