संविधान दिनानिमित रंगला ‘संविधान लोककला शाहिरी जलसा’
पुणे, दि २७
‘होता भीमराव म्हणून माय तुझ्या बोटाला लागली शाई ..’, ‘फक्त पायदळ सेना होती माझ्या भीमाकडे..’, ‘माझ्या भिमाने घटनेला हिऱ्या मोत्यांनी सजविलं..’, ‘जगातली देखणी बाई मी भीमाची लेखणी..’ अशी एकासरस एक बहारदार शाहीरी सादर करत संविधान मूल्ये, सामाजिक समता आणि लोकशाहीची ताकद लोककलेद्वारे पुणेकरांना अनुभवायला मिळाली.
निमित्त होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘संविधान लोककला शाहिरी जलसा’ कार्यक्रमाचे. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून “माझे संविधान – माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाहीर शीतल साठे, सचिन माळी, सदाशिव निकम, पृथ्वीराज माळी आदी कलाकारांनी शाहीरी सादर केली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, रिपाइं पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे प्रमुख शैलेंद्र चव्हाण, अशोक शिरोळे, डॉ विजय खरे, सरिता वाडेकर, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, अविनाश कदम आदी उपस्थित होते.
संविधानाच्या उद्देशीकेचे सामुहिक वाचन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर ‘भीमराया वंदाया कवन शाहिरी…’ हे गाणे सादर झाले. त्यानंतर ‘सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये..’, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांच्यावरील बहारदार लोकगीतं सादर होत कार्यक्रमाला रंग चढला. त्यानंतर ‘कुणी नाही केलं माय माझ्या भिमाने केलं ..’, ‘माझी मैना गावाकड राहिली..’, ‘देश उभा केला संविधानाने..’, ‘ माझ्या भिमान भलं केलं ग बया.., ‘जगातली देखणी बाई मी भीमाची लेखणी..’, ‘चांदण्याची छाया माझा भीमराया..’ अशा अनेक लोकप्रिय गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.
संविधानातील मूलभूत मूल्यांची जनजागृती व लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या विशेष कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.
यावेळी दहा लाख रुपयांची कचरा वेचताना सापडलेली बॅग मूळ मालकास परत करणाऱ्या प्रामाणिक सफाई कामगार अंजू माने यांना रोख पाच हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला. कार्यकमांची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. ज्ञानेश्वर जाविर यांनी केले.KK/ML/MS