वणीला प्रदूषणमुक्त करणार आणि पांढरकवड्याला ‘एमआयडीसी’ देणार

 वणीला प्रदूषणमुक्त करणार आणि पांढरकवड्याला ‘एमआयडीसी’ देणार

यवतमाळ, दि २६

कोळसा खाणी आणि वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करुन वणी प्रदूषणमुक्त केले जाईल. तसेच पांढरकवडा येथे एमआयडीसी सुरु करुन बेरोजगारीचा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. विदर्भातील वणी, पांढरकवडा आणि घाटंजी नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वणी आणि पांढरकवडा येथे प्रचार सभा घेतल्या. यावेळी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

वणी नगर परिषदेसाठी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी कुमारी पायल तोडसाम यांच्यासह २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वणी हे महिला सबलीकरणाचे शक्तीपीठ आहे. विकासाचे उर्जा स्थळ आहे. या शहरातील कोळसा खाणी आणि वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भर सभेत महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना फोन लावला. येथील हवा आणि पाणी दूषित झाले असून यावर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कदम यांना दिले. ते पुढे म्हणाले की वणीचा विकास हाच शिवसेनेचा एकच ध्यास आहे. पायल तोडसाम या विदर्भाकडून क्रिकेट खेळतात. येत्या २ डिसेंबरला त्या विरोधकांची विकेट घेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पांढरकवडा येथे जाहीर सभा घेतली. पांढरकवडा नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. अभिनय नहाते निवडणूक लढवत असून २२ उमेदवार रिंगणात आहेत. यात १२ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. घाटंजी नगर परिषदेसाठी शिवसेनेचे गजानन ढवळे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. यासह २० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पांढरकवडामधील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी येथे एमआयडीसी देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यावेळी त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना थेट फोन करुन एमआयडीसीबाबत विचारणा केली. त्यावर तात्काळ एमआयडीसी मंजूर करु, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी यावेळी फोनवर दिले. लोकांच्या प्रश्नासाठी कारणे न देता तात्काळ निर्णय घेतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पांढरकवडा आणि घाटंजी नगर परिषदांसाठी शिवसेनेचे पूर्ण पॅनल निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केले.

पांढरकवडा ही ग्रीन सिटी म्हणून ओळखतो. येथील पाणी पुरवठा योजनेसाठी ६५ कोटींचा निधी दिला. चांगले रस्ते, पिण्याचे पाणी, भुयारी गटार योजना, उद्याने विकसित करण्यासाठी नगर विकास विभागाकडून निधी दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ज्यांनी आम्हाला खुर्चीत बसवले त्यांचे प्रश्न सोडवणे हा आमचा अजेंडा आहे, असे ते म्हणाले. शासन आपल्या दारी, लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांना मदत, महिलांना एसटीमध्ये सवलत अशा अनेक योजना राबवल्या. कामाचे श्रेय घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. आपले वचन म्हणून धनुष्यातून सुटलेला बाण आहे, एकदा वचन दिले की ते पूर्ण करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मंत्री संजय राठोड हे पांढरकवडा आणि घाटंजीचा विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे ते म्हणाले.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *