नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चितळ स्थानांतराची दुसरी फेरी यशस्वी….
चंद्रपूर दि २६ :— चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर) येथून नवेंगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) येथे चितळ स्थानांतराची दुसरी फेरी यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

कोणतीही जिवितहानी न होता एकूण 63 चितळे सुरक्षितपणे जामनी गवताळ परिसरातून नागझिरा प्रकल्पातील सॉफ्ट-रिलीज एनक्लोजरमध्ये हलविण्यात आले. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकही मृत्यू झालेला नाही.


चितळ हा अतिशय संवेदनशील प्राणी असून पकडण्याच्या प्रक्रियेदरम्यान किंवा मानवी जवळीक, हाताळणी, वाहतूक यावेळी तीव्र ताणामुळे त्यांना मानसिक धक्का बसू शकतो. या ताणामुळे हृदयाचे विकार निर्माण होऊन अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते, ज्याला ‘कॅप्चर मायोपथी’ असे म्हटले जाते. मात्र आजच्या स्थानांतरणात एकाही प्राण्याचा मृत्यू झालेला नाही, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे.
जामनी गवताळ परिसरात तयार करण्यात आलेल्या बोमा पद्धतीचा वापर करून चितळांना सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. या परिसरातील योग्य अधिवास आणि चितळांची उपलब्धता या प्रक्रियेस पूरक ठरल्या. बोमामधून प्राण्यांना विशेष तयार केलेल्या ट्रान्सलोकेशन वाहनांतून हलविण्यात आले. या वाहनांची रचना प्राण्यांचा ताण कमी करण्याच्या आणि प्रवास सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे.ML/ML/MS