मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रतिष्ठेच्या
पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
मुंबई, दि २५: मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी देण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुरस्काराचे यंदाचे ६२ वे वर्ष आहे. माध्यमसमूह, संपादक, स्वत: पत्रकार अथवा सहकारी पत्रकारही योग्य उमेदवाराचे नाव या पुरस्कारासाठी सुचवू शकतात. २०२५ या वर्षात उल्लेखनीय काम केलेल्या तसेच पुरस्कारास पात्र ठरणार्या पत्रकारांची नावे आवश्यक ती कागदपत्रे व कात्रणांसह मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन, ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर चौक, महापालिका मार्ग, आझाद मैदान, मुंबई ४०० ००१ येथील कार्यालयात सोमवार, दि. १५ डिसेंबर, २०२५ पर्यंत पाठवावीत, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केले आहे.
आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार, जयहिंद प्रकाशन पुरस्कार, कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार, विद्याधर गोखले पुरस्कार, रमेश भोगटे पुरस्कार आणि वृत्तवाहिनीत काम करणार्या वरिष्ठ कॅमेरामनसाठीचा पुरस्कार अशा एकुण सहा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, आणि दहा हजार रुपायंचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कारांचा तपशील
१. आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार : बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार.
२. जयहिंद प्रकाशन पुरस्कार : पत्रकारितेला उपयुक्त ठरणार्या विषयावर (उदा. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी) लेखन लिहिणार्या पत्रकाराचे चालू सालातील उत्कृष्ट पुस्तक, यामध्ये ललित साहित्य किंवा कथासंग्रहाचा विचार केला जाणार नाही.
३. कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार : कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील लिखाणाबद्दल दिला जाणारा पुरस्कार.
४. विद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार : पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा पुरस्कार.
५. रमेश भोगटे पुरस्कार : उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणारा पुरस्कार. (वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिनी)
६. शिरीष कणेकर स्मृती पुरस्कार : सिनेमा व मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ सिनेपत्रकारासाठीचा पुरस्कार
७. वैभव कनगुटकर स्मृती वृत्तवाहिनी कॅमेरामन पुरस्कार : इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणार्या वरिष्ठ वृत्तवाहिनी कॅमेरामनसाठीचा पुरस्कार.
वरील पुरस्कारासाठी संपादक किंवा स्वत: पत्रकार तसेच अन्य सहकारी वर्तमानपत्रातील पत्रकारांची शिफारस करू शकतात. संबंधित माहिती बातमी, वृत्तांत, लेख यांच्या झेरॉक्स प्रतीसह अर्ज सादर करावा.
अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी दिली. KK/ML/MS