आता मुंबईतही बिबट्याची दहशत
मुंबई, दि. २४ : गोरेगावच्या दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री अपरात्री बिबटयाचा वावर पाहायला मिळत आहे, हा बिबट्या कॅमेरात सुद्धा कैद झाला आहे. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे येथील रहिवाशी लोकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचे मुंबईतील संभाव्य हल्ले रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहिले आहे.
गोरेगावमधील या भागात अगोदर संरक्षण जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. मात्र, या जाळ्या ओलांडून बिबट्या सोसायटीमध्ये येत आहेत. त्याच, अनुषंगाने सोसायटी सदस्यांच्या पत्राचा दाखला देत, आमदार सुनिल प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहलं आहे. बिबट्याचे संभाव्य हल्ले आणि जीवितहानी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, असे आमदार प्रभू यांनी पत्रात म्हटले आहे.
गोरेगाव पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रात, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या, न्यु दिंडोशी रॉयल हिल्स को. ऑप. हौ. सोसायटीचे 77 रो-हाऊस व शेजारी न्यु म्हाडा कॉलनी असून एंकदरित या परिसरात सुमारे 5 हजार रहिवाशी वास्तव्य करीत आहेत. सदरहू परिसरात माहे-आक्टोंबरपासून रात्री- अपरात्री बिबटयांचा संचार होत आहे. या परिसरातील रहिवाशी जनतेमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची 6 फुट उंच जाळी ओलांडून बिबटे सोसायटी परिसरात प्रवेश करित आहेत.
SL/ML/SL