58 व्या वर्षीय पोलीस अधीक्षकांनी मुलासह पूर्ण केली आयर्न मॅन स्पर्धा
कोल्हापूर, दि. २४ : कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी आपल्या मुलासोबत दुबईतील आंतरराष्ट्रीय T100 Triathlon World Tour स्पर्धेत सहभाग घेतला होता. विष्णू ताम्हाणे यांनी वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचा 19 वर्षांचा मुलगा गौरांग सोबत ही स्पर्धा अवघ्या 5 तास 50 मिनिटांमध्ये पूर्ण केली आहे.
विष्णू ताम्हाणे आणि मुलगा गौरांग या पिता पुत्रांनी T100 Triathlon World Tour ही स्पर्धा पाच तास पन्नास मिनिटमध्ये पूर्ण केली. दरम्यान, ताम्हाणे यांनी केवळ ट्रायथलॉनच नव्हे, तर चिरंजीव गौरांग व कन्या तेजस्वी यांच्यासह 15,000 फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग करून आणखी एक साहसी पराक्रम केला आहे.
दुबईतील या ट्रायथलॉनमध्ये जगभरातून दहा हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दुबई येथे 13 ते 16 नोव्हेंबरदरम्यान ट्रायथलॉन स्पर्धा पार पडली होती. 16 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या T100 Triathlon World Tour या 100 किमीच्या कठीण स्पर्धेत (स्विमिंग 2 किमी, सायकलिंग 80 किमी, रनिंग 18 किमी) ताम्हाणे पिता-पुत्रांनी दमदार कामगिरी केली.
आयर्नमॅन स्पर्धा ही एक अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक ट्रायथलॉन स्पर्धा असून ही तीन टप्प्यांमध्ये आयोजित केली जाते. यात पोहणे, सायकलिंग आणि धावणे यांचा समावेश असतो. आयर्नमॅन स्पर्धा ही जगातील सर्वात कठीण एक दिवसीय स्पर्धा मानली जाते, ज्यामध्ये शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो.