ताम्हिणी घाटातील गाडीचा अपघात, ४८ तासांनंतर माहित कळली.
अलिबाग दि २० –
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात पुणे माणगांव मार्गावर ताम्हिणी घाटात मोठा अपघात घडला आहे. कोकण आणि पुण्याला जोडणारा ताम्हिणी घाटदेखील अपघातप्रवण बनला आहे.
गेल्या आठवड्यात एक सनरूफ कारवर दगड कोसळण्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतर आता एक भीषण अपघात झाला असून यात चौघांचे मृतदेह सापडले आहेत तर दोघांचा शोध सुरू आहे. गंभीर बाब म्हणजे हा अपघात तब्बल ४८ तासांपूर्वी झाला असून ही दुर्घटना आज (२० नोव्हेंबर) उघडकीस आली.
माणगावकडून पुण्याच्या दिशेने जाणारी थार गाडी ताम्हिणी घाटात एक तीव्र वळणावरून थेट ५०० फूट दरीत कोसळली. चालकाला या वळणाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना झाल्याचे कळते. या थार गाडीत सहाजण होते. ते कोकण पाहण्यासाठी आले. परतीच्या प्रवासात ही दुर्घटना घडली. दोन दिवसांपूर्वी रात्री ही दुर्घटना घडली.
नातेवाईकांचा त्यांच्या मुलांशी संपर्क होत नसल्याने त्यांनी मुलांचे नंबर ट्रेस केले. तेव्हा ते ताम्हिणी घाटात असल्याचे लक्षात आले. तेव्हाच त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पालकांनी पोलिसांना कळवल्यानंतर आज शोधाशोध झाली आणि त्यांची गाडी दरीत कोसळल्याचे निदर्शनास आले.
दरीची खोली पाहून पोलिसांनी रेस्क्यू टीमला बोलावले आणि शोध सुरू झाला. सकाळी ४ मृतदेह सापडले तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे. मात्र, यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घाटात अपघात होऊनही कुणाला पत्ता लागला नाही.ML/ML/MS