ऑपरेश लोटस “मुळे मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना मंत्र्याचा बहिष्कार..
मुंबई दि १८ : (खंडुराज गायकवाड ) भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे “ऑपरेश लोटस” करीत असल्याने याचा वाद आज मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी एका नाराजी नाट्यातून दिसून आला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याने एकच राजकीय खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता सेनेचे सर्वच मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात ठाण मांडून होते. अखेर मुख्यमंत्र्यांशी चर्चा संपल्यावर या नाराजी नाट्याला पूर्णविराम मिळाला.
भाजपमधील वाढत्या इनकमिंगवर शिंदेसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना भाजप गळाला लावत असल्याचा आक्षेप शिंदे यांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केला. त्यावरुन फडणवीस यांनी शिंदे यांच्या मंत्र्यांना चांगलेच सुनावलं. फोडाफोडीची सुरुवात तुम्ही उल्हासनगरात केली, अशा शब्दांत फडणवीस यांनी सेनेच्या मंत्र्यांना झापलं
असल्याचे समजते.
सध्या नवीमुंबई,रायगड उल्हासनगर,डोंबिवली येथे भाजपा विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर जोरदार कुरघोडी सुरू आहे.याच नाराजीचा स्फोट आज अखेर झाला.
निवडणुकीत युतीचा धर्म पाळला जात नसल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी सबुरीने घ्यावा.एकमेकांना प्रवेश देवू नका.अशा सूचना केल्या.तुम्ही उल्हासनगरमध्ये जे केले ते आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये केले असे स्पष्ट केले.
सध्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर अचूक बाण चालवला आहे. त्यांच्या या आक्रमक राजकारणामुळे शिवसेना चांगलीच घायाळ झालेली आहे. आज एकीकडे शिवसेनेचे मंत्री फडणवीस यांच्याकडे जाऊन भाजपमधील वाढत्या पक्ष प्रवेशांबद्दल नाराजी व्यक्त करत असताना त्याच वेळी चव्हाण मात्र राजू शिंदे यांचं भाजपमध्ये स्वागत करत होते. राजू शिंदे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढले आहेत.
२०२९ मध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे. त्याची तयारी चव्हाण यांनी आतापासूनच सुरु केली आहे का? अशी चर्चा सध्या जोरदारपणे सुरू आहे. शिंदेसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये चव्हाण यांनी पुढील निवडणुकीसाठी उमेदवार तयार करण्यास सुरुवात केली आहे असल्याचेही बोलले जात आहे.ML/ML/MS