मुंबईतील भटके श्वान संख्या नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रमाची सक्रिय अंमलबजावणी
मुंबई, दि. १७
मुंबईतील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने प्राणी जन्म नियंत्रण (अॅनिमल बर्थ कंट्रोल-एबीसी) कार्यक्रम सक्रियपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, महानगरपालिकेच्या सहकार्याने प्राणी कल्याण संस्थांकडून भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, भटक्या प्राण्यांना अन्न देणारे नागरिक आणि प्राणीपालकांनी संबंधित प्राणी कल्याण संस्थांच्या स्वयंसेवकांना सहकार्य करावे. भटक्या श्वानांबाबत कोणत्याही अफवा पसरवू नयेत किंवा या प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
माननीय सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांबाबत नुकतेच दिलेले निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने अंमलात आणले जात आहेत. तत्पूर्वी, भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवणे आणि अनियंत्रित वाढ रोखण्याच्या उद्देशाने प्राणी जन्म नियंत्रण (अॅनिमल बर्थ कंट्रोल-एबीसी) कार्यक्रम प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत, महानगरपालिकेच्या सहकार्याने एकूण ८ प्राणी कल्याण संस्थांकडून भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण केले जात आहे. तसेच, एकूण ३ प्राणी कल्याण संस्था संबंधित श्वानांचे त्यांच्या अधिवासाच्या ठिकाणीच रेबीजविरोधी लसीकरण करत आहेत. या संस्थांकडून केवळ निर्बिजीकरण आणि लसीकरणाच्या उद्देशानेच भटके श्वान पकडले जात आहेत.
तथापि, भटक्या प्राण्यांना अन्न देणारे नागरिक आणि प्राणीपालकांनी संबंधित प्राणी कल्याण संस्थांच्या स्वयंसेवकांना सहकार्य करावे. भटक्या श्वानांबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत किंवा या प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. भटक्या श्वानांसंदर्भात अधिक माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाशी ७५६४९७६६४९ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.KK/ML/MS