SBI बंद करणार ही प्रसिद्ध सेवा
मुंबई, दि. 17 : SBI ने त्यांची लोकप्रिय mCASH सेवा 30 नोव्हेंबर 2025 नंतर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन SBI आणि लाइट अॅपद्वारे पैशांची देवाणघेवाण आणि क्लेम करण्याची सुविधा संपेल. जे खातेदार फक्त मोबाइल नंबर किंवा ईमेलद्वारे त्वरित पैसे पाठवत होते, त्यांना आता नवीन पर्याय शोधावे लागतील. बँकेने वेबसाइटवर नोटीस जारी करून ग्राहकांना सुरक्षित डिजिटल मार्गांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.
mCASH ही सेवा जुन्या तंत्रज्ञानावर आधारित सेवा असल्याने ती कालबाह्य झाली आहे. यूपीआयसारख्या आधुनिक पद्धतींनी त्याचे महत्त्व कमी झाले. आता बहुतेक लोक सेकंदात व्यवहार करतात, त्यामुळे एमकॅशचा वापर खूपच कमी झाला. एसबीआय डिजिटल रूपांतराच्या मोठ्या योजनेत गुंतले असून, सुरक्षित आणि वेगवान पर्यायांना प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
mCASH बंद झाल्यानंतर यूपीआय हा मुख्य पर्याय आहे. एसबीआयचे भीम एसबीआय पे अॅप सर्व बँक ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. शॉपिंग, बिल भरणे, रिचार्ज, टॅक्सी बुकिंग यासाठी हे सोयीचे आहे. यासोबतच आयएमपीएस (24 तास त्वरित ट्रान्स्फर), एनईएफटी आणि आरटीजीएस हे सर्व सुरक्षित आणि सोपे पर्याय आहेत.
mCASH ही SBIची खास योजना होती, ज्यात लाभार्थ्याची माहिती जोडण्याची गरज नव्हती. फक्त मोबाइल किंवा ईमेल आयडी टाकून पैसे पाठवता येत होते. पैसे घेणाऱ्याला एसएमएस किंवा ईमेलद्वारे सुरक्षित लिंक आणि 8 अंकी पासकोड मिळत असे, ज्याने तो कोणत्याही बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करू शकायचा. लाइट किंवा एमकॅश अॅप (गूगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड) वापरून एमपीआयएन सेट करून लॉगिन करून क्लेम करता येत होते. भविष्यासाठी आवडीनुसार खाते सेव्हही करता येत. ही सेवा छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी लोकप्रिय होती.
SL/ML/SL