अद्वितीय बाळासाहेब ठाकरे कलादालन’ हा सरनाईकांचा मोठा ‘प्रताप’ !”
मीरा-भाईंदर, दि. १७ :
महाराष्ट्राच्या अस्मितेची प्रत्येक क्षणी बुलंद घोषणा करणारे, लाखो शिवसैनिकांच्या हृदयातील देव, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज मीरा-भाईंदर शहरात एक ऐतिहासिक क्षण साकारला गेला. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन’ सर्वसामान्य जनतेसाठी आजपासून अधिकृतपणे खुले करण्यात आले. यावेळी आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी, त्यांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहिले होते.
या कलादालनाच्या संकल्पनेचे जनक व पुढाकार घेणारे परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी आज या कलादालनाच्या माध्यमातून एक ऐतिहासिक स्वप्न मीरा -भाईंदर शहरात वास्तवात उतरवलं आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक विचार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनदृष्टिचे अविस्मरणीय दर्शन घडवणारे मिरा-भाईंदर शहरच नव्हे तर संपूर्ण भारतातील हे पहिले तंत्राधारित कलादालन सर्वसामान्य जनतेसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आयुक्त राधा बिनोद शर्मा, अभियंता दिपक खांबित, युवा नेते पूर्वेश सरनाईक यांच्यासह शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलादालनातील सात अद्भुत अनुभव
१)बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित विशेष दालन
दालनात पाऊल ठेवताच बाल ठाकरे ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा जिवंत होतो. दादरच्या खांडके बिल्डिंगपासून, मातोश्री मधील बाळासाहेबांची खोली आणि शिवसेना भवनच्या आठवणीपर्यंत सर्व काही हुबेहूब प्रतिरूपात उभारले आहे. या ठिकाणी नागरिकांना बाळासाहेब ठाकरे यांची जुनी भाषणे एकता येतील, त्यांच्यासोबत एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फोटो काढता येईल.
२) मुलांसाठी विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक गेम झोन
खेळता–खेळता बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इंटरअॅक्टिव्ह गेम्स झोन या ठिकाणी साकारण्यात आले आहे.
३) स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी स्टडी सेंटर
UPSC, MPSC, IAS, IPS, IRS, IFS , IFoS व इतर स्पर्धा परीक्षांसाठी शांत, सुसज्ज स्टडी सेंटरचा तयार करण्यात आले आहे. मीरा -भाईंदर शहरातील पहिल्या १०० विद्यार्थ्यांना इथे आपल्या भविष्यासाठी तयारी करता येईल.
४) विज्ञानप्रेमींसाठी सायन्स सेंटर
अंतराळ, नवग्रह आणि खगोलशास्त्र यांची आधुनिक टेक-आधारित ओळख. हे केंद्र म्हणजे मनोरंजन आणि तंत्रज्ञान याचे योग्य मेळ साधणारे केंद्र आहे. जिथे अंतराळातील अनुभव घेता येईल.
५) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष दालन
जुनी गाणी, माहितीपट, आरोग्यविषयक व्हिडिओ, चर्चासत्रे आणि उपक्रमांसाठी खास जागा या केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
६)शहरातील पहिले छोटे नाट्यगृह
नाट्यप्रेमी आणि कलावंतांना हक्काचा मंच जिथे मीरा -भाईंदर शहरातील कलाप्रेमींना नियमित शो, उपक्रम आणि कला सादरीकरणाची सुवर्णसंधी उपलब्धता येईल.
७) चित्रकारांसाठी आर्ट गॅलरी
उभरत्या चित्रकारांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी खास कलादालनाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी प्रमाणे इथे देखील चित्रकार आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवून आपली कला इतरांपर्यंत पोहचवू शकतात.
या भव्य उद्घाटनावेळी भावनिक होत मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “हे कलादालन निर्माण होणे म्हणजे माझ्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे मला वाटत आहे. आज बाळासाहेब ठाकरे या कलादालनाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. जे स्वप्न बाळासाहेबांनी पाहिलं होत ते आज या कलादालनाच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा मला आनंद आहे. मीरा-भाईंदर शहरातील प्रत्येक नागरिकाला आता बाळासाहेबांना जवळून अनुभवता येईल, त्यांच्या विचारांशी संवाद साधता येईल. मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. त्यांची ८०% समाजकारण आणि २०% राजकारण ही शिकवण माझ्या प्रत्येक कार्याच्या मुळाशी आहे. हे कलादालन साधं दालन नाही, तर हे बाळासाहेबांच्या विचारांचं, धैर्याचं आणि प्रेरणेचं भव्य प्रतीक आहे.
नागरिकांनी इथून सुंदर आठवणी आणि प्रेरणा घेऊन जावं, हाच माझा संकल्प. हे कलादालन म्हणजे बाळासाहेबांची कायमची उपस्थिती असणारे स्थळ आहे. हे कलादालन उभं राहावं यासाठी मिरा-भाईंदर शहरातील ९ नगरसेवकांनी संघर्ष केला आहे आणि आज त्या ९ वर्षांच्या संघार्षानंतर हे कलादालन सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे.!”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की, “बाळासाहेबांचे विचार जनमानसात रुजावेत यासाठी हे कलादालन म्हणजे उपयुक्त आणि अभिमानास्पद पाऊल आहे. प्रताप सरनाईक यांनी घेतलेला पुढाकार अनुकरणीय आहे. बाळासाहेबांचा वारसा आज अत्याधुनिक पद्धतीने महाराष्ट्राला अनुभवायला मिळतोय, हे पाहून मन आनंदित झालं. बाळासाहेबांचा वारसा अत्याधुनिक पद्धतीने महाराष्ट्राला अनुभवायला मिळणं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हे कलादालन म्हणजे प्रताप सरनाईक यांचा दूरदृष्टीपूर्ण आणि अनुकरणीय पुढाकार आहे.”ML/ML/MS