श्रीनगर पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू

 श्रीनगर पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू

श्रीनगर, दि.१५ : दिल्ली पाठोपाठ श्रीनगरही प्रचंड स्फोटाने हादरले आहे. नौगाम पोलीस स्टेशनमध्ये काल (दि. १४) रात्री जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने तपासताना अचानक भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी किमान ५ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मृत आणि जखमींमध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि फॉरेन्सिक टीमच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नौगाम पोलीस स्टेशनमध्ये सुमारे ३६० किलो स्फोटक रसायने, डेटोनेटर, वायर, आणि IED तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे आवश्यक साहित्य ठेवण्यात आले होते. ही स्फोटके फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातून जप्त करण्यात आली होती. हरियाणातील फरिदाबादमध्ये अटक केलेल्या डॉ. मुजम्मिल गनईच्या भाड्याच्या घरातून ही सामग्री जप्त करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री सुमारे ११.२० च्या दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये फॉरेन्सिक टीम आणि पोलीस अधिकारी या स्फोटकांचे नमुने तपासत असताना प्रचंड मोठा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की पोलीस स्टेशनच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून आसपासच्या परिसरातही हादरे जाणवले.

प्राथमिक माहितीनुसार, जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये मोठा स्फोट होण्यासाठी डेटोनेटर किंवा विशिष्ट ट्रिगरची गरज असते, त्यामुळे हा केवळ अपघात आहे असे स्पष्टपणे म्हणता येत नाही. तपास यंत्रणा दहशतवादी हल्ल्याच्याही शक्यतेने तपास करत आहेत.

या स्फोटानंतर सलग छोटे स्फोट होत असल्याने बॉम्ब निकामी पथकाला (BDDS) घटनास्थळी बचावकार्य करताना अडथळे आले. जखमींवर ९२ आर्मी बेस हॉस्पिटल आणि SKIMS सौरा येथे उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. NIA, SOG, आणि स्थानिक पोलीस मिळून संपूर्ण घटनेची तपासणी युद्धपातळीवर करत आहेत. अपघाताच्या किंवा दहशतवादी कटाच्या शक्यतेवर तपास सुरू असून अधिक तपशील लवकरच समोर येतील अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *