गाझाचे दोन भागात विभाजन करण्यासाठी अमेरिका सज्ज
अमेरिका गाझा पट्टीचे दोन भागात विभाजन करण्याच्या योजनेवर गाझा पट्टीतील दीर्घकालीन संघर्ष आणि विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका एक नवीन योजना पुढे आणत आहे. या योजनेनुसार गाझाला दोन स्वतंत्र विभागांमध्ये विभागले जाणार आहे – “ग्रीन झोन” आणि “रेड झोन.” ग्रीन झोन हा भाग इस्रायली सैन्य आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलांच्या नियंत्रणाखाली असेल, जिथे पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. तर रेड झोन हा भाग विद्यमान स्थितीतच, म्हणजेच उद्ध्वस्त अवस्थेत ठेवला जाणार आहे, जिथे कोणतेही पुनर्निर्माण होणार नाही.
अमेरिकेच्या लष्करी दस्तऐवजांनुसार, सुरुवातीला परदेशी सैन्यदल इस्रायली सैनिकांसोबत गाझाच्या पूर्व भागात तैनात केले जातील. या विभागाला विद्यमान “यलो लाईन”ने वेगळे केले जाईल, जी इस्रायली सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे. या योजनेचा उद्देश गाझामध्ये काही प्रमाणात स्थैर्य निर्माण करून पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरू करणे असा आहे. मात्र, रेड झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कोणतीही सुविधा किंवा पुनर्वसन मिळणार नसल्याने मानवी संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गाझामधील सुमारे ८० टक्के इमारती, शाळा आणि रुग्णालये उद्ध्वस्त झालेली आहेत. लाखो नागरिक विस्थापित झाले असून, तात्पुरत्या छावण्यांमध्ये त्यांचे हाल अपेष्टा सुरू आहेत. अशा परिस्थितीत ग्रीन झोनमध्ये पुनर्निर्माण सुरू करण्याची घोषणा केली जात असली तरी रेड झोनमधील लोकांना दुर्लक्षित केले जात असल्याची टीका होत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
योजनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मान्यता मिळेल का, याकडे जगभराचे लक्ष लागले आहे. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी या विषयावर महत्त्वपूर्ण ठरावावर मतदान होणार आहे. इस्रायलने या योजनेला पाठिंबा दर्शवला असला तरी पॅलेस्टिनी गटांनी तीव्र विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, गाझाचे विभाजन हे त्यांच्या भूमीवर कायमस्वरूपी कब्जा करण्याचा प्रयत्न आहे.
या घडामोडींमुळे गाझा पट्टीतील संघर्षाचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त नियंत्रणाखालील ग्रीन झोनमध्ये पुनर्निर्माण सुरू होईल, तर रेड झोनमध्ये मानवी संकट अधिक गडद होईल. त्यामुळे पश्चिम आशियातील राजकीय समीकरणे आणि शांतता प्रक्रियेवर याचा दूरगामी परिणाम होणार आहे.
SL/ML/SL