अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही : हर्षवर्धन सपकाळ

 अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही : हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि १४

राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत वाद पराकोटीला गेले आहेत पण सत्तेसाठी हे सर्वजण एकत्र आहेत. सत्तेसाठी काहीही व वाट्टेल ते अशी त्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेसाठी लाचार आहेत त्यामुळे सत्ता सोडून ते राहू शकत नसल्यानेच ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे काँग्रेसच्या राज्य निवडणूक मंडळाची दोन दिवसांची बैठक पार पडली. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, सहप्रभारी बी. एम. संदीप, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, वजाहत मिर्झा,प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, सचिन नाईक आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्य निवडणूक मंडळाच्या दोन दिवस चाललेल्या या बैठकीत नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय समिकरणं वेगळी आहेत. स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी चर्चा करून आघाडी करण्यात आली आहे. काही जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी, शेकाप, शेतकरी संघटना, रासप यांच्याशी आघाडी झालेली आहे. मनेसशी आघाडी करण्यासंदर्भात कोणत्याच जिल्ह्यातून प्रस्ताव आलेला नाही, असे सपकाळ यांनी सांगितले.

भाजपा पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश..
चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप आमदार बंटी भागडिया यांचे कट्टर समर्थक आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

महायुतीमध्ये फसवणूक झाल्याची भावना तीनही पक्षातील असंख्य पदाधिकाऱ्यांच्या मनात वाढीस लागलेली आहे. आगामी काळात सत्ताधारी पक्षातील अनेक महत्वाचे नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असे हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले..

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भूसारी यांचे काल अपघातात दुःखद निधन झाले. आजच्या राज्य निवड मंडळ बैठकीच्या सुरूवातीला सर्वांनी मौन राहून त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *