‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’ मध्ये पाठवण्याचे न्यायालयाचे निर्देश
मुंबई, दि. १३ : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर धुडगुस घालून नागरिकांना त्रस्त करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीच्या स्थलांतराबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. न्यायालयाने हा हत्ती तात्पुरत्या स्वरूपात गुजरातमधील ‘वनतारा’ सेंटरकडे हलवण्याचे निर्देश दिले आहेत. ‘वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट 1972 नुसार, हत्ती मानवी वस्तीसाठी धोकादायक ठरल्यास त्याला हलवण्याची तरतूद आहे, ज्याचा आधार घेत वनविभागाने कारवाई केली आहे. या निर्णयामुळे, सिंधुदुर्ग-कोल्हापूर सीमेवरील ‘ओंकार’ हत्तीचे स्थलांतर आता तातडीने होणार आहे. ‘ओंकार’ हत्ती प्रकरणाच्या पुढील कार्यवाहीसाठी एका उच्चस्तरीय चौकशी समितीची नेमणूक करण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित कडेठणकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर फिरणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला पकडण्याच्या वनविभागाच्या हालचालींना आव्हान देत प्रा. रोहित कांबळे यांनी 9 ऑक्टोबर 2025 रोजी सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली होती. ‘ओंकार’ हत्ती दोडामार्ग परिसरात मानवी वस्तीत वारंवार घुसत असल्याने वनविभाग त्याला ‘वनतारा’ येथे पाठवण्याच्या प्रयत्नात होता.
याचिकाकर्त्यांनी ॲड. उदय वाडकर आणि ॲड. केदार लाड यांच्यामार्फत युक्तिवाद करताना सांगितले की, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील कलम 12 नुसार, हत्तीचा अधिवास (Habitat) बदलण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. त्यांनी ‘ओंकार’ ला चांदोली अभयारण्य, राधानगरी अभयारण्य किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडावे, अशी मागणी केली होती. तसेच, कोल्हापूर वन विभागात पूर्वी झालेल्या 8 हत्तींच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी न्यायालयासमोर केली.
सरकारी पक्षातर्फे ॲड. टी. जे. कापरे यांनी बाजू मांडताना सांगितले की, वन विभागाकडे सध्या ‘वनतारा’ व्यतिरिक्त ‘ओंकार’साठी इतरत्र कोणतीही व्यवस्थित सोय उपलब्ध नाही. हा युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्यायनिवाड्यांचा आधार घेऊन, खंडपीठाने ‘ओंकार’ हत्तीला तात्पुरत्या स्वरूपात गुजरातमधील ‘वनतारा’ सेंटरमध्ये हलवण्याचे आदेश दिले.
SL/ML/SL