मुंब्र्यामध्ये ATS कडून मोठी कारवाई; शिक्षकाच्या घरावर छापा

 मुंब्र्यामध्ये ATS कडून मोठी कारवाई; शिक्षकाच्या घरावर छापा

ठाणे, दि. १२ : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यातील अल-कायदा प्रकरणाशी संबंधित ठाण्यातील मुंब्रा-कौसा परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत इब्राहिम अबिदी नावाच्या शिक्षकाच्या घरावर एटीएसने छापा टाकत त्याची सखोल चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिम अबिदी हा मुंब्रा येथील कौसा भागात भाड्याने राहत होता आणि दर रविवारी कुर्ल्यातील एका मशिदीत मुलांना उर्दू शिकवत असे. मात्र, त्याच्या वागणुकीबद्दल संशय निर्माण झाल्यानंतर एटीएसने त्याच्यावर लक्ष ठेवले होते. तपासादरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अबिदी हा शिक्षकाच्या माध्यमातून काही तरुणांना अतिरेकी विचारांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे.

एटीएसने छापा टाकताना त्याच्या राहत्या घरासह कुर्ल्यातील दुसऱ्या पत्नीच्या घराचीही झडती घेतली. या कारवाईदरम्यान अबिदीच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल फोन, लॅपटॉप, आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ही सर्व सामग्री फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात येणार असून, त्यातून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

एटीएसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, ही कारवाई पुण्यात उघडकीस आलेल्या अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) या दहशतवादी संघटनेशी संबंधित तपासाचा एक भाग आहे. काही दिवसांपूर्वी पुणे आणि मुंबईतून काही संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच मुंब्रा परिसरात ही छापेमारी करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या अबिदीची कसून चौकशी सुरू असून, त्याचे संपर्क, सोशल मीडियावरील हालचाली आणि त्याच्याशी निगडित नेटवर्क यांचा तपास सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मुंब्रा आणि आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *