सोयाबीनला चांगला दर, बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक….
वाशीम दि १२ : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी आणि मंगळवारी सोयाबीनची विक्रमी आवक झाली असून, त्यामुळे बाजार परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. या अभूतपूर्व आवकेमुळे मोजणी आणि लोडिंग प्रक्रियेत मोठा विलंब होत असल्याने आज (बुधवार) खरेदी प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे.
या संदर्भात बाजार समितीकडून व्यापारी, हमाल-मजूर आणि शेतकरी यांना अधिकृत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आज बाजारात शेतमाल घेऊन येऊ नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाने केले आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या प्रचंड सोयाबीन आवकेमुळे यार्डमध्ये वाहनांची मोठी रांग लागली असून, जागेअभावी मालाची मोजणी आणि लोडिंग प्रक्रियेला विलंब होत आहे.
बाजार समितीने यंत्रणेला शिस्तबद्धपणे कामकाज सुरळीत करण्यासाठी आवश्यक वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज एक दिवस व्यवहार बंद ठेवून गुरुवारपासून पुन्हा खरेदी-विक्री प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, सोयाबीनच्या चांगल्या उत्पादनामुळे आणि वाढत्या भावांमुळे शेतकरी मोठ्या संख्येने माल विक्रीसाठी आणत असल्याचे चित्र जिल्हाभरात पाहायला मिळत आहे.ML/ML/MS