थाटामाटात पार पडला श्री शिवाजी विद्यालयातील शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
पुणे दि. ११ : देहूरोड येथील श्री शिवाजी माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व व्यवसायातील १९९६-१९९७ या १० वी बॅचमधील शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा नुकताच थाटामाटात पार पडला. यावेळी तब्बल २८ वर्षानंतर शिक्षक व माजी विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह, प्रेम, उर्जा यांचा सुंदर मिलाफ पहावयास मिळाला.
या स्नेहसंमेलनात विविध विषयातील सुमारे ४० शिक्षक व १२० माजी विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. या शाळेतील माजी विद्यार्थी, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर, अनेक खाजगी कंपनीमध्ये मॅनेजर, आय.टी. क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती/तज्ञ, नगरसेवक व इतर अशा समाजातील प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. सर्व माजी विद्यार्थ्यांनी याचे श्रेय शाळेलाच दिले हे विशेष.
श्री शिवाजी विद्यालय, देहूरोड ही शाळा सन १९६१ पासून देहूरोड व आजूबाजूच्या ग्रामीण भागात शिक्षणाच्या पवित्र कार्यात अग्रेसर आहे. या शाळेने शिक्षण क्षेत्राच्या पवित्र कार्याद्वारे अनेक पिढ्या घडविल्या, शाळेने शिक्षणाच्या माध्यमातून लावलेल्या बिजांना अंकुर फुटून त्याचा वटवृक्ष झाला आहे व तो वटवृक्ष समाजास दिशा दाखविण्याचे कार्य करत आहे.
या स्नेहसंमेलनास माजी प्राचार्य डुंबरे , शिंदे, सध्याचे प्राचार्य शिंदे, तसेच अनेक शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध प्रेरणादायी व्यक्ते व निवेदक प्रा. लक्ष्मण शेलार यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना मोहन पाटील, सहाय्यक डाक अधिक्षक, मुंबई यांनी केली. तर आभार प्राध्यापक सुवर्णा धुमाळ सिध्दे यांनी केले.ML/ML/MS