लवकरच गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर निर्णय घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
ठाणे, दि १०: गिरणी कामगार घराच्या प्रश्नावरील आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी,१४ ते १६ कामगार संघटना एकत्र आलेल्या, “गिरणी कामगार संयुक्त लढा समिती”च्या वतीने ठाणे येथे
आयोजित करण्यात आलेला “स्मरण मोर्चा” आज चांगलाच गाजला.
मोर्चाला ठाणे पोलीसांनी परवानगी नाकातली असली तरी कामगार नेत्यांच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली होती,तर उपस्थित हजार दीड हजारावरील कामगारांनी ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकासमोर निदर्शन छेडले.
निदर्शनात कोण म्हणतो देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही,अशा गगनभेदी घोषणा देत कामगारांनी ठाणे परिसर दणाणून सोडले. गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने निदर्शने करून,एकप्रकारे रखडलेल्या गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर झोपलेल्या सरकारला चांगलेच जागे केले आहे!
९ जुलै रोजी कामगारनेते आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली १४ कामगार संघटनांच्या वतीने आझाद मैदान येथे नेत्रदीपक आंदोलन छेडण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर १० जुलै रोजी राज्या चे उपमुख्यमंत्री (गृहनिर्माण) एकनाथ शिंदे यांनी विधान भवनमध्ये कामगारनेते आणि संबंधित अधिकारा-यांची बैठक बोलावून, गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेतले होते.
सरकारने शेलु व वांगणी येथील घर बांधणी संदर्भात
१५ मार्च २०२४ रोजी अध्यादेश जारी करुन,त्यात कामगारांच्या घरांचा हक्क हिरावून घेणारे १७ वे कलम पारीत केले होते.परंतु कामगार संघटनांच्या आवाजी मागणीवर ते कलम रद्द करुन,नवा अध्यादेश जारी करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील बैठकीत घेतला होता. त्याच प्रमाणे मुंबईत जेथे-जेथे जागा उपलब्ध होतील तेथे-तेथे घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गिरणी कामगारांमध्ये दिलासा निर्माण झाला होता. गिरणी कामगारांच्या उर्वरित घरबांधणीवर कालबद्ध कार्यक्रमही आखण्याचे सरकारने मान्य केले होते.
परंतु तीन महिन्याचा कालावधी लोटून गेला तरी सरकारने या प्रश्नी कोणताही निर्णय घेतला नाही तसेच संबंधित सभेचे मिनिटही नेत्यांना उपलब्ध करून दिले नाही.या पार्श्वभूमीवर परेल येथे ३१ ऑक्टोबर रोजी लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या गिरणी कामगार संघटनांच्या बैठकीत कामगार नेत्यांनी सरकारच्या घराच्या प्रश्नावरील दुर्लक्षीत धोरणावर नापसंती व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे,वागळे इस्टेट येथील “नंदनवन” या निवासस्थानी शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्याप्रमाणे आश्वासनांचीपूर्ती करण्यासाठी त्यांना स्मरण करून देण्यात आले.
ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे ठाणे येथे पोहोचताच,निवृत्ती देसाई,कॉ.विजय कुलकर्णी,हेमंत गोसावी,ऍड.अरुण निंबाळकर,रमाकांत बने,बबन मोरे, आनंद मोरे,डॉ. संतोष सावंत आदी कामगार नेत्यांच्या शिष्टमंडळांने “नंदवन”बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, आश्वासनांचीपूर्ती त्वरित करावी असा आग्रह धरला.
त्यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाशी बोलताना म्हणाले, संबंधित प्रश्नावर माझ्याकडे फाईल आली असून आता फक्त सही करायची बाकी आहे.
ठाणे रेल्वे स्थानकासमोरील निदर्शन आंदोलनात ऍड.बबन मोरे,बाळ खवणेकर,श्री.आत्याळकर,सुनील बोरकर,शिवाजी काळे आदी नेत्यांनी,सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यास जी दिरंगाई केली,त्यावर टीका केली.
घराच्या प्रश्नावर आज दिलेल्या आश्वासनाची पूर्तता नाही केली तर येणाऱ्या पालीका निवडणूकीवर त्याचे भिषण परिणाम होतील,असा आजच्या आंदोलनाद्वारे सरकारला इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनात राष्ट्रीय मिल मजदूर संघ, सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार सेना,हेमंतधागा जनकल्याण फाउंडेशन,संयुक्त मराठी मुंबई चळवळ,एनटीसी कामगार असोसिएशन,गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती, गिरणी कामगार सभा, मुंबई गिरणी कामगार युनियन, सातारा जिल्हा कामगार समिती, गिरणी कामगार रोजगार आणि निवारा, कल्याण सेवाभावी संस्था, कोन पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समिती, गिरणा जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र, गिरणी चाळ भाडेकरू संघ,दत्ता इस्वलकर वारस संघर्ष समिती या संघटना गिरणी कामगार संयुक्त लढा समितीत सामील होऊन या लढ्यात उतरल्या होत्या.KK/ML/MS