दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलतीची कैतके यांची मागणी
मुंबई दि ९ : राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली असून उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाकडून एसटी महामंडळाला परतावा स्वरूपात दिली जाते. या धर्तीवरच दिव्यांग प्रवाशांसाठीही मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत देण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि ‘पत्रकार रुग्णमित्र’ म्हणून ओळखले जाणारे दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुंबई मेट्रो प्रशासन यांच्याकडे केली आहे.
कैतके यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुंबई मेट्रोच्या स्थानकांमध्ये आणि गाड्यांमध्ये अद्याप दिव्यांग अनुकूल सुविधा पूर्णपणे उपलब्ध नाहीत. अनेक दिव्यांग प्रवाशांना प्रवास करताना सहकारी व्यक्तीची मदत घ्यावी लागते. त्यामुळे त्यांच्या प्रवासाचा खर्च दुपटीने वाढतो. या अडचणींचा विचार करून, शासनाने दिव्यांग बांधवांसाठी मेट्रो प्रवास पूर्णपणे मोफत करावा, अशी त्यांची मागणी आहे.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, शासनाने एसटी प्रवासात महिलांना जशी सवलत दिली, त्याचप्रमाणे मेट्रो प्रवासासाठीही शासनाने परतावा योजनेच्या माध्यमातून मेट्रो प्रशासनाला आर्थिक सहाय्य द्यावे. यामुळे मेट्रो प्रशासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही, उलट दिव्यांगांसाठी हा निर्णय मानवी आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने एक मोठं पाऊल ठरेल.
दीपक कैतके यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाचा दाखला देत सांगितले की, शासनाने आपल्या एकूण अर्थसंकल्पाच्या किमान ५ टक्के रक्कम दिव्यांग कल्याणासाठी खर्च करणे अपेक्षित आहे. या निधीतून मेट्रो सवलतीसाठी लागणारा परतावा सहज शक्य आहे आणि शासनाला कोणतीही अडचण येणार नाही.
त्यांनी पुढे निदर्शनास आणले की, त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच मेट्रो प्रशासनाने अलीकडेच दिव्यांग प्रवाशांना २५ टक्के सवलत देण्यास मान्यता दिली आहे. मात्र, ही सवलत अपुरी असल्याचे स्पष्ट करत कैतके यांनी संपूर्ण सवलतीची मागणी पुन्हा केली आहे.
कैतके यांनी पुढे म्हटले आहे की, “मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे मोजमाप आणि नोंद ठेवली जाते. दिव्यांग प्रवाशांना सवलतीचा पास दिल्यास, त्या प्रवाशाने किती वेळा प्रवास केला याचा संपूर्ण लेखाजोखा मेट्रो प्रशासनाकडे उपलब्ध राहतो. त्यामुळे शासनाने या नोंदींच्या आधारे परतावा स्वरूपात मेट्रो प्रशासनाला रक्कम देणे अत्यंत सुलभ आहे.”
दिव्यांग व्यक्तींना प्रवासात सुलभता, सन्मान आणि समान हक्क मिळावेत, यासाठी दीपक कैतके यांनी गेल्या काही वर्षांपासून शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या मागणीला सामाजिक संस्थांपासून ते नागरिकांपर्यंत व्यापक पाठिंबा मिळत असून, आता शासनाने संवेदनशीलतेने विचार करून लवकरात लवकर “मेट्रो प्रवासात दिव्यांगांना संपूर्ण सवलत” जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
“मानवतेचा आणि सामाजिक न्यायाचा संगम — दिव्यांग प्रवाशांसाठी मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत देणे हे सरकारचे संवेदनशील आणि दूरदर्शी पाऊल ठरेल,” असे ज्येष्ठ पत्रकार दीपक कैतके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.ML/ML/MS