मनोज जरांगेना मुंबई पोलीसांकडून समन्स
मुंबई, दि. ८ : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. जरांगे पाटील यांना येत्या 10 तारखेला (नोव्हेंबर) चौकशीसाठी आझाद मैदान पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी ही नोटीस जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी विरेंद्र पवार यांना देखील पाठवली आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे सध्या जरांगे पाटील अडचणीत आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे समन्स जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात केलेल्या उपोषणादरम्यान झालेल्या कथित उल्लंघनांशी संबंधित आहेत. मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या नियम आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
या आंदोलनासाठी कोणतेही अधिकृत परवानगी न घेतल्याचा आरोप करत पोलिसांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात मनोज जरांगे पाटील आणि इतर सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी समन्समध्ये मनोज जरांगे-पाटील आणि इतर पाच जणांना 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान आझाद मैदान पोलिस स्टेशनमधील तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
SL/ML/SL