मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदाच इलैयाराजा यांचे संगीत
मुंबई, दि. ७ : दिग्दर्शक संतोष डावखर लवकरच ‘गोंधळ’ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट घेऊन येत आहेत. याच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं ‘चांदणं’ नुकतंच प्रदर्शित झालं. प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या गाण्याची खासियत म्हणजे पद्मविभूषण पुरस्कार विजेते संगीतकार इलैयाराजा यांनी या गाप्ण्याला संगीत दिलं आहे. भारतीय संगीत विश्वातील दिग्गज इलैयाराजा यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी गाण्याला संगीत दिले आहे.
अजय गोगावले, आर्या आंबेकर आणि अभिजीत कोसंबी या तीन लोकप्रिय गायकांनी ‘चांदणं’ हे गाणं गायलं आहे. हे रोमँटिक गाणं योगेश सोहोनी आणि इशिता देशमुख या जोडीवर चित्रित झालं आहे. सोशल मीडियावर या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यानचे काही व्हिडिओही शेअर करण्यात आले आहेत. इलैयाराजा यांनी आर्या आणि अजय यांना मार्गदर्शन करताना पाहणं संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरली आहे.
इलैयाराजा यांनी १५०० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे आणि ७ हजारांहून अधिक गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्यांनी मुख्यतः तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. सदमा या हिंदी चित्रपट, चित्रपटातील “ऐ जिंदगी गले लगा ले” हे त्यांनी संगीतबद्ध केलेले गीत अत्यंत लोकप्रिय आहे.
SL/ML/SL