‘वंदे मातरम्’ च्या 150 व्या वर्षपूर्ती उत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली, दि. 7 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर केल्या जाणाऱ्या उत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, वंदे मातरम् हे केवळ शब्द नव्हेत – हा एक मंत्र आहे, एक उर्जा, एक स्वप्न आणि एक पवित्र निश्चय आहे. वंदे मातरम् हे भारतमातेप्रति भक्ती आणि आध्यात्मिक समर्पण यांचे मूर्त रूप आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की हा एक शब्द आपल्याला आपल्या इतिहासाशी जोडतो, आपला वर्तमानकाळ आत्मविश्वासाने भरून टाकतो आणि आपल्या भविष्यकाळाला असा धीर देण्यासाठी प्रेरित करतो की, कोणताही निश्चय पूर्ण होणार नाही असा नसतो आणि कोणतेही ध्येय आपल्या आवाक्याबाहेर नसते.
वंदे मातरम् गीताचे समूहगान हा खरोखरीच अभिव्यक्तीच्या मर्यादेपलीकडील एक उदात्त अनुभव होता असे वर्णन करत, पंतप्रधान मोदी यांनी सागितले की इतक्या संख्येने गाणाऱ्या आवाजांतून एक अद्वितीय लय, एकच स्वर, एक सामायिक रोमांचकारी भावना आणि एक अखंडित प्रवाह उदयाला आला. आपल्या मनाला ऊर्जेने भारून टाकणाऱ्या निनादाबद्दल आणि सुसंवादाच्या लहरींबद्दल त्यांनी भाष्य केले. मोदी म्हणाले की, 07 नोव्हेंबर हा एक ऐतिहासिक दिवस असून या दिवशी देश वंदे मातरम् या गीताची 150 वी वर्षपूर्ती साजरी करत आहे. हा पवित्र प्रसंग आपल्या नागरिकांना नवी प्रेरणा देईल आणि नव्या ऊर्जेने भारून टाकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहासाच्या पानांमध्ये या दिवसाची नोंद करण्यासाठी वंदे मातरम् गीताला समर्पित विशेष स्मरणार्थ नाणे तसेच टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. भारतमातेला प्राणार्पण केलेले सर्व शूरवीर आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वांना आदरांजली वाहत पंतप्रधान मोदी यांनी या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले आणि वंदे मातरम् या गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त प्रत्येक नागरिकाला शुभेच्छा दिल्या.
स्वतंत्र अस्तित्वाच्या विशुध्द भावनेत रुजलेली भारताची संकल्पना आणि तात्विक शक्ती ही जागतिक सत्तांचा उदय आणि पतन यांपासून पूर्णतः वेगळी आहे हे अधोरेखित करुन, मोदी म्हणाले की जेव्हा ही जाणीव लिखित आणि लयबद्ध रुपात व्यक्त झाली तेव्हा त्यातून वंदे मातरम् सारख्या कलाकृतीची निर्मिती झाली. “म्हणूनच, वसाहतवादी काळात वंदे मातरम् हा भारत स्वतंत्र होईल, भारतमातेच्या बाहूंनी बंधनांच्या साखळ्या तुटतील, आणि तिची लेकरे स्वतःच त्यांच्या भाग्याची शिल्पकार होतील, या निर्धाराचा उद्घोष झाला,” मोदी ,म्हणाले.
बंकिमचंद्र यांची आनंदमठ ही केवळ एक कादंबरी नव्हे- तर ते स्वतंत्र भारताचे स्वप्न आहे, हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे शब्द आठवत, बंकिम बाबूंच्या रचनेतील प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक भावना यात गहन अर्थ दडला आहे हे लक्षात घेत पंतप्रधानांनी आनंदमठ मधील वंदे मातरम् गीताच्या व्यापक महत्त्वावर अधिक भर दिला. ते म्हणाले की जरी हे गाणे वसाहतवादी काळात रचलेले असले तरीही त्यातील शब्द कधीही त्या गुलामगिरीच्या शतकांच्या छायेत मर्यादित राहिलेले नव्हते. हे शब्द अधीनतेच्या आठवणीपासून मुक्त होते आणि म्हणूनच वंदे मातरम् हे गीत प्रत्येक युगात आणि प्रत्येक वयासाठी समर्पक ठरते.या गीताची “सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यशामलाम मातरम” ही पहिली ओळ उच्चारत पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे शब्द म्हणजे निसर्गाचे दिव्य वरदान लाभलेल्या आपल्या मातृभूमीला केलेले अभिवादन आहे.
पंतप्रधानांनी या प्रसंगी एक स्मारक टपाल तिकिट आणि नाणे देखील प्रकाशित केले. हा कार्यक्रम 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 पर्यंत वर्षभर चालणाऱ्या देशव्यापी स्मरणोत्सवाची औपचारिक सुरुवात आहे, जो भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि राष्ट्रीय अभिमान आणि एकता जागृत करणाऱ्या या कालातीत रचनेच्या 150 वर्षांचा उत्सव साजरा करतो. या उत्सवात सार्वजनिक ठिकाणी “वंदे मातरम्” च्या संपूर्ण आवृत्तीचे सामूहिक गायन झाले. यात मुख्य कार्यक्रमासह समाजातील सर्व घटकांमधील नागरिकांचा सहभाग होता.
2025 मध्ये वर्ष वंदे मातरम् ला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आपले राष्ट्रीय गीत “वंदे मातरम्” हे 1875 मध्ये 7 नोव्हेंबर रोजी अक्षय नवमीच्या शुभ मुहूर्तावर लिहिले होते. वंदे मातरम् हे त्यांच्या आनंदमठ या कादंबरीचा भाग म्हणून बंगदर्शन या साहित्यिक जर्नलमध्ये प्रथम प्रकाशित झाले. मातृभूमीला शक्ती, समृद्धी आणि दिव्यतेचे मूर्त स्वरूप म्हणून आवाहन करणारे हे गीत भारताच्या एकता आणि स्वाभिमानाच्या जागृत भावनेला काव्यात्मक अभिव्यक्ती देते. लवकरच ते राष्ट्राप्रति भक्तीचे एक स्थायी प्रतीक बनले.