मध्य रेल्वेच्या मोटरमन्सनी केले आंदोलन, वाहतूक ४५ मिनिटे ठप्प
मुंबई, दि. ६ : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोटरमन आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक काम थांबवून आंदोलन सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी 5:50 वाजल्यापासून लोकल सोडण्यात आलेल्या नव्हत्या, ज्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या युनियनने पुकारलेल्या या संपामुळे लोकलसेवा सुमारे 45 मिनिटे ठप्प झाली होती. त्यानंतर आता वाहतूक सुरळीत झाली आहे.
*मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना*
मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांच्या गर्दीच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन झालं त्यामुळेच ही अपघाताची घटना घडल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. सॅन्डहर्स्ट रोड स्थानक परिसरात तीन प्रवासी रुळांवर चालत होते. या दरम्यान मशीद स्थानक परिसरात रेल्वे धडकेत काही प्रवाशांचा अपघात झाला. सुरुवातीला यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. यानंतर आता तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
संध्याकाळच्या ‘पीक आवर’मध्ये लोकलसेवा थांबल्याने हजारो प्रवासी स्थानकांवर खोळंबले होते. सायंकाळी 6:40 मिनिटांनी लोकलची वाहतूक पुन्हा सुरू झाली असली तरी, या आंदोलनामुळे लोकल सध्या 40 ते 45 मिनिटे उशिराने धावत आहेत. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
आंदोलनाचे कारण काय?
जून 2025 मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ काही प्रवाशी लोकलमधून मृत्यूमुखी पडले होते. यात 4 जणांचा मृत्यू झाला होता, तर 9 जण जखमी झाले होते. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी रेल्वे विभागातील 2 अभियंत्यांवर ठपका ठेवत गुन्हा दाखल केला. याच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचारी संघटनांनी आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात एनआरयूएम संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी मोर्चा काढला. तसेच, मोटरमन देखील आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली. लोकल थांबल्याने सीएसएमटी स्थानकावर अनेक लोकल उभ्या होत्या आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
संध्याकाळच्या ‘पीक आवर’मध्ये झालेल्या या आंदोलनामुळे लोकल वाहतूक पावणेसहा वाजेपर्यंत थांबली होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वे युनियनसोबत बोलणी सुरू केली. लोकल सेवा त्वरित पूर्ववत व्हावी, यासाठी डीआरएम आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांसोबत यशस्वी बोलणी झाल्यानंतर सुमारे पावणेसात वाजता लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
जीआरपीने अभियंत्यांविरोधात दाखल केलेल्या केसच्या विरोधात हे आंदोलन होते. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन थांबवण्यात आले आहे. तथापि, पावणेसहा ते पावणेसात या वेळेत लोकल सेवा ठप्प असल्याने, सध्या मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरू राहील, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिली आहे.
SL/ML/SL
SL/ML/SL